खासगी सावकारीला चाप कधी ?
सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ येथे एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. प्रारंभी खासगी सावकाराचे पैसे देऊ शकत नसल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर दोन जणांनी त्यांना विष देऊन त्यांची हत्या केल्याचे मान्य केले आहे, असे समोर आले आहे. पोलीस अन्वेषणात काळाच्या ओघात यातील सत्य पुढे येईलच. असे असले, तरी खासगी सावकारीमुळे आत्महत्या केल्याचा हा पहिला प्रकार नसून यापूर्वीही अनेक घटना झाल्या आहेत. खासगी सावकारीचा विळखा इतका प्रचंड असतो की, कर्जाच्या वसुलीने अनेकांना कंगाल केले, अनेकांना त्यांची पूर्ण संपत्ती विकावी लागली, अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर अनेकांनी शेवटचा पर्याय म्हणजे आत्महत्येचाच मार्ग स्वीकारला.
खासगी सावकारीच्या संदर्भात शासनाचा कायदा कागदोपत्री अस्तित्वात आहे. ज्यात विनापरवाना खासगी सावकारी करणाऱ्यांना ५ वर्षे सक्तमजुरी आणि ५० सहस्र रुपये दंड अशी तरतूद आहे; मात्र नगण्य जणांवर या कायद्यान्वये कारवाई होते.
भारतात कर्ज मिळवण्यासाठी असलेल्या बँकेची क्लिष्टता, बँकांकडून मागण्यात येणारी कागदपत्रे आणि तारण यांमुळे अनेक जण खासगी सावकारांकडून पैसे घेणे पसंत करतात. अनेक छोटे-मोठे विक्रेते, व्यावसायिक ज्यांची ऐपत नसते, ते खासगी सावकारांकडूनच पैसे घेऊन धंदा करतात. या सावकारांचा व्याज दर २० ते ३० टक्के, तसेच दामदुप्पट, चौपट असा कितीही असतो. अनेक सावकारांकडे पैसे वसूल करणारी गुंडांची यंत्रणाही असते. हे सर्व पोलीस प्रशासनास ठाऊक नाही, असे म्हणणे हास्यास्पद होईल. काही ठिकाणी पोलीस कारवाई करण्याचे टाळतात. अनेक सामान्य नागरिक खासगी सावकारांच्या भीतीपोटी, तसेच उलट पोलिसांचाच जाच टाळण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे खासगी सावकारीचे चक्र मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रबळ इच्छाशक्ती दाखवून सावकारी टोळ्यांना कठोर शिक्षा कशी होईल, याठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे झाले, तरच खासगी सावकारीला आळा घालणे शक्य होईल !
– श्री. अजय केळकर, सांगली