मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी राज्यशासन राबवणार विविध नाविन्यपूर्ण उपक्रम !
मुंबई – शासकीय कामकाज, नियमितचा व्यवहार, तंत्रज्ञान, शैक्षणिक अभ्यासक्रम, सार्वजनिक उपक्रम आदींमध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक उपयोग व्हावा, यासाठी राज्यशासनाने ८ विस्तारित उपक्रम घोषित केले आहेत. प्रतिवर्षीच्या साचेबद्ध उपक्रमांतून बाहेर पडून मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी शासनाकडून हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार असून त्यासाठी २ कोटी २१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
१. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाकडून प्रतिवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’, ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिन’ आदी उपक्रम राबवले जातात.
२. या व्यतिरिक्त सरकारकडून आता अन्य विस्तारित उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये मराठी भाषाविषयक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, शालेय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन, ग्रंथालयांना पुस्तकांच्या स्वरूपात साहाय्य, तांत्रिकदृष्ट्या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनुदान देणे, साहित्यिकांचा सन्मान, सीमावर्ती भागात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रम, अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त मराठी भाषाविषयक प्रावीण्य परीक्षा घेणे, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार होण्यासाठी मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या स्तरावर विविध उपक्रम राबवणे आदी उपक्रम शासन राबवणार आहे.
मराठी भाषेचा स्वतंत्र अभ्यासक्रम चालू करण्याचे आवाहन !
विद्यापीठ आणि महाविद्यालये यांमध्ये मराठी शिकवण्यासाठी स्वतंत्र नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम चालू करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. इंग्रजी भाषेतील विविध अभ्यासक्रम मराठी भाषेतूनही चालू केल्यास शासनाकडून विद्यापिठांना प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे. मराठी भाषेच्या उपयोगातून रोजगारनिर्मिती करून देऊ शकतील, असे उपक्रम हाती घेण्याचे आवाहनही सरकारकडून विद्यापिठे आणि महाविद्यालये यांना करण्यात आले आहे.
तंत्रज्ञानात मराठी भाषेच्या उपयोगासाठी संशोधन करण्याचे आवाहन !
भ्रमणभाष, ई-मेल आदी आधुनिक संपर्काच्या साधनांमध्ये मराठी भाषेचा उपयोग सहजतेने करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करणे, आधुनिक तंत्रज्ञान, नवीन वैज्ञानिक शोध सर्वसामान्यांपर्यंत मराठी भाषेत पोचवणे, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणारे मराठी भाषेतील छोट्या व्हिडिआेंची निर्मिती करणे आदींसाठी सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. गूगलशी (माहिती शोधण्याचे संकेतस्थळ) करार करून मराठी भाषेतील शब्दकोश गूगलवर उपलब्ध करणे, संगणकीय ज्ञानजालावर (इंटरनेट) जगातील वेगवेगळ्या भाषांसह मराठीचा शब्दकोश उपलब्ध करणे आदींसाठी सरकारकडून आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे.
मराठी भाषेच्या प्रचारासाठी करण्यात येणार विज्ञापनांची निर्मिती !
माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाद्वारे मराठी भाषेचा प्रचार अन् प्रसार यांसाठी विज्ञापने सिद्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये वर्तमानपत्रांमध्ये विज्ञापने देणे, मराठी भाषेच्या उपयोगाविषयी जागरूकता निर्माण करणारे व्हिडिओ सिद्ध करणे, बसस्थानके, रेल्वेस्थानके आदी ठिकाणी भित्तीपत्रके लावणे, आकाशवाणी, दूरदर्शन, सामाजिक माध्यमे आदींवरून मराठी भाषेविषयी जागृती निर्माण करणारे कार्यक्रम, व्हिडिओ प्रसारित करणे आदी विविधांगी उपक्रमांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यासाठी सरकारकडून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, उच्च अन् तंत्र शिक्षण विभाग, शालेय विभाग यांद्वारे हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. मराठी भाषामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती या सर्वांवर नियंत्रण ठेवणार आहे. ज्यांना या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत मराठी भाषा विभागाकडे प्रस्ताव द्यावयाचे आहेत. वर्ष २०२२-२३ च्या प्रस्तावासाठी ३१ जुलैपर्यंत समयमर्यादा देण्यात आली आहे. याविषयी मराठी भाषा विभागाकडून २४ जून या दिवशी शासन आदेश काढण्यात आला असून त्यामध्ये याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाया उपक्रमांना अन्य शासकीय कामांप्रमाणे पाट्याटाकू स्वरूप येऊ नये, यासाठी त्यांच्या फलनिष्पत्तीचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे ! |