मला काळजी वाटते, तुम्ही परत या ! अजूनही वेळ गेलेली नाही !  

मुख्यमंत्र्यांची बंडखोर आमदारांना भावनिक साद

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ जून या दिवशी पुन्हा एकदा पक्षाच्या बंडखोर आमदारांना परत येण्याची भावनिक साद घातली आहे. ‘मला काळजी वाटते. अजूनही वेळ गेलेली नाही. समोर या, बसा, आपण निश्‍चितच काहीतरी मार्ग काढू’, असे त्यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की,

१. आपण (बंडखोर आमदार) गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याविषयी प्रतिदिन नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच जण संपर्कातही आहेत.

२. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनीही संपर्क साधून स्वतःच्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो.

३. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे, आपण या. माझ्यासमोर बसा. शिवसैनिक आणि जनता यांच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्‍चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कुणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका.

४. शिवसेनेने जो मान-सन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही. समोर येऊन बोलल्यास मार्ग निघेल.

आता वेळ निघून गेली आहे ! – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रत्युत्तर देतांना गौहत्ती येथे गेलेले आमदार एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘आता वेळ निघून गेली आहे. आमचे म्हणणे आम्ही मुख्यमंत्र्यांना २ वर्षांपासून सांगत आहोत; पण त्यांनी आमच्या म्हणण्याची नोंदही घेतली नाही. त्याचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना झाला.’’