पाटबंधारे विभागाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून बंडगार्डन (पुणे) येथे नदीपात्रात काम चालू !
पुणे – पाटबंधारे विभागाने नकार दिला असतांनाही महापालिकेने बंडगार्डन येथे नदीपात्रात ‘नदी सुधार योजने’च्या कामाला प्रारंभ केल्याने पर्यावरण अभ्यासक आणि नदीप्रेमी संस्था यांनी आक्षेप घेतला आहे. ‘नदीपात्रात चालू असलेल्या कामामुळे पूर आल्यास त्यास उत्तरदायी कोण ?’, असा प्रश्न नदीप्रेमींनी विचारला असून भविष्यात निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या रोखण्यासाठी शहरातील विविध नदीप्रेमी संस्था आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत. (जे नदीप्रेमींना समजते, ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लक्षात येत नाही का ? नदीप्रेमींच्या आक्षेपांविषयी त्यांनी काय कार्यवाही केली आहे ? – संपादक) गेल्या ६ मासांपासून त्यांचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त, इतर पदाधिकारी आणि पाटबंधारे विभाग यांच्याकडे प्रकल्पाच्या विरोधात पाठपुरावा चालू आहे.
नदीपात्रात सध्या चालू असलेल्या कामामुळे सलीम अली अभयारण्यातील पक्ष्यांचा अधिवास नष्ट होणार आहेच, तसेच जैववैविध्याची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. या प्रकल्पामुळे भूगर्भातील उथळ, तसेच जिवंत झऱ्यांचे रक्षण कसे करणार ? याचे महापालिकेने उत्तर द्यावे. महापालिकेच्या समवेत झालेल्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये आम्ही विचारलेल्या प्रश्नांची प्रशासनाने समाधानकारक उत्तरे दिल्याविना प्रकल्पाच्या कार्यवाहीचा विचारही करू नये, अशी भूमिका संस्थांनी मांडली आहे.