इतरांना साहाय्य करणाऱ्या आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या ११९ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !
पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘आतापर्यंत सनातनच्या अनेक साधकांची आणि अनेक संतांची माहिती सनातनच्या साधकांनी लिहून दिली आहे; पण संत होण्यापूर्वीची त्यांची माहिती अल्प प्रमाणात साधकांनी लिहून दिली आहे. या लेखात श्रीमती मंदाकिनी डगवार यांची संत होण्यापूर्वीची माहिती अनेक साधकांनी लिहून दिली आहे. यावरून ‘संत’ म्हणून जाहीर करण्यापूर्वीही त्या कशा होत्या, हे लक्षात येते ! अशा पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.६.२०२२) |
१. सौ. वनिता किरसान, वर्धा
१ अ. आज्ञापालन करणे : ‘पू. अशोक पात्रीकरकाकांनी सांगितलेली सूत्रे काकू वहीत लिहून ठेवतात आणि नंतर ती कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करतात. काकू त्यानुसार सेवा करतात आणि साधकांकडून सेवा करवून घेतात. एकदा पू. काकांनी त्यांना साधकांच्या घरी जाऊन संपर्क करण्याची सेवा सांगितली. त्याप्रमाणे काकूंनी साधकांच्या घरी जाऊन त्यांना संपर्क केले. काकूंनी साधकांच्या साधनेतील अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर उपाययोजनाही सांगितल्या.
१ आ. प्रांजळपणा : काकू पू. पात्रीकरकाकांना घरातील किंवा सेवेतील प्रसंग मनमोकळेपणाने आणि प्रांजळपणे सांगतात. त्यांच्या मनात अयोग्य विचार आल्यास त्या पू. काकांना भ्रमणभाष करून योग्य दृष्टीकोन जाणून घेतात.
१ इ. त्या समष्टी सेवा करतांना प्रत्येक कृती पू. पात्रीकरकाकांना विचारून करतात.
१ ई. प्रेमभाव
१. आम्ही संपर्काला जात असतांना काकूंच्या पिशवीत नेहमी चॉकलेट किंवा बिस्कीट असायचे. काकू ते साधकांच्या मुलांना द्यायच्या. तेव्हा त्या मुलांना पुष्कळ आनंद व्हायचा.
२. मी काकूंच्या समवेत सेवा करतांना त्यांनी मला कशाचीही उणीव भासू दिली नाही. त्यांनी मला प्रांजळपणे चुका सांगून साहाय्य केले. माझी प्रकृती चांगली नसतांना मी ६ दिवस रुग्णालयात होते. तेव्हा त्या प्रतिदिन मला भेटायला यायच्या. त्या वेळी त्या मला सतत सत्मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायच्या.
१ उ. काकू व्यष्टी साधना पूर्ण करूनच समष्टी सेवेला आरंभ करतात. त्या प्रत्येक क्षणाचा वापर समष्टी सेवेसाठी करतात.
१ ऊ. सतर्कता : एकदा आम्ही नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांकडे संपर्काला गेलो होतो. त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्हाला पुष्कळ त्रास जाणवत होता आणि दुर्गंध येत होता. त्या वेळी काकूंनी तत्परतेने अत्तर आणि कापूर यांचे उपाय केले अन् मलाही करायला सांगितले.
१ ए. कठीण प्रसंगात स्थिर रहाणे : डगवारकाकांचे निधन झाल्याचे काकूंना ठाऊक नव्हते. तेव्हा मी घरी असतांना ‘काकूंना हे कसे सांगायचे ?’, असा मला प्रश्न पडला. मी त्यांच्या घरी गेल्यावर त्या मला न्यास करून नामजप करत असतांना दिसल्या. काही वेळाने मी त्यांना काकांचे निधन झाल्याचे सांगितले. तेव्हा काकू शांत आणि स्थिर होत्या.’
२. सौ. भार्गवी नीरज क्षीरसागर, वर्धा
२ अ. नियोजनकौशल्य आणि तत्परता : ‘काकू दुसऱ्या दिवशी करायच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे नियोजन आदल्या दिवशीच करतात अन् त्याप्रमाणे तत्परतेने कृती करतात. त्या कुठलेही सूत्र प्रलंबित ठेवत नाहीत.
२ आ. स्थिरता
१. स्थिरता हा काकूंचा स्थायी गुण आहे. कितीही कठीण प्रसंग आला किंवा एका वेळेला अनेक सेवा आल्या, तरीही त्या स्थिरतेने प्रत्येक कृती करतात.
२. त्यांच्या आईचे निधन झाले, त्या वेळी त्यांनी स्थिर राहून परिस्थिती स्वीकारली. त्यांनी त्यांच्याकडील अहवाल आणि हिशेब पूर्ण करून अन् संबंधित साधकाला ते देऊन मगच त्या आईच्या गावाला गेल्या.
३. श्री. डगवारकाकांच्या निधनाच्या वेळीही त्यांचा नामजप आणि व्यष्टी साधना चालू होती, तसेच घरात भ्रमणभाषवर नामजप चालू ठेवण्याकडेही त्यांचे लक्ष होते.
२ इ. संतांप्रती भाव : त्यांच्यात संत आणि सद्गुरु यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. कुठलीही अडचण आली, तर त्या लगेच संतांना विचारतात. ‘संतांच्या कृपेमुळेच साधना सहजतेने होते’, असा त्यांचा भाव असतो.
२ ई. चुकांविषयी संवेदनशीलता : काकूंकडून एखादी चूक झाल्यास त्या सत्संगात प्रांजळपणे सांगतात, तसेच त्यावर प्रायश्चित्त घेऊन पापक्षालनासाठी तळमळीने प्रयत्न करतात.’
३. सौ. शिल्पा शशिकांत पाध्ये, वर्धा
अ. ‘त्या नातेवाइकांमध्ये अडकल्या नाहीत.
आ. त्या नेहमी साधक आणि समाजातील व्यक्ती यांना साधनेचे दृष्टीकोन देऊन ‘सकारात्मक कसे रहायचे ?’, याविषयी सांगतात.
४. सौ. माधुरी चिमूरकर, वर्धा
४ अ. ‘काकू सतत हसतमुख असतात.
४ आ. प्रेमभाव
१. काकू सर्व साधकांवर आईप्रमाणे प्रेम करतात. त्यांच्या बोलण्यात गोडवा जाणवतो. काकू साधकांना सेवेचे महत्त्व पटवून सांगतात. त्यांच्या बोलण्याने साधकांना सेवा करण्याची उभारी मिळते.
२. मला अर्धांगवायूचा झटका आला असतांना मी त्यांना भ्रमणभाष केला. त्या वेळी त्यांनी लगेच पू. पात्रीकरकाकांना विचारून मला मंत्रजप पाठवला. त्यांनी मला भ्रमणभाष करून माझी विचारपूस केली. त्यानंतर ३ दिवसांनी त्या मला बघायलाही आल्या. या मंत्रजपामुळे माझ्यात ७ दिवसांत फरक पडला.’
५. श्रीमती सरिता निखार, वर्धा
‘डगवारकाकूंविषयी मला म्हणावेसे वाटते,
‘अहोभाग्य त्या जिवाचे । कौतुक होई संत वाचे ।।
अशीच कृपा करी आम्हावरी । घेई तव चरणी सत्वरी ।।’
६. सौ. माधुरी पाटील, वर्धा
अ. ‘कठीण प्रसंगामध्ये डगवारताईंशी बोलल्यावर मला दृष्टीकोन मिळून स्थिरता येते. त्यामुळे माझी व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होते.
आ. त्यांच्याशी बोलल्यावर मला चैतन्य मिळून उत्साह वाटतो.’
७. सौ. सविता भोंडे, सेलू
७ अ. ‘प्रेमभाव : काकू मला भ्रमणभाष करायच्या, तेव्हा त्या घरातील प्रत्येक सदस्याची विचारपूस करायच्या.
७ आ. एकदा काकूंना आमच्या गावातील एका साधिकेशी बोलायचे होते. काकूंचा भ्रमणभाषवर तिच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिच्याशी बोलण्यासाठी काकूंनी मला त्या साधिकेला माझ्या घरी बोलवायला सांगितले. त्या वेळी ‘साधा कॉल’ न लागल्याने काकूंनी मला ‘व्हॉट्स ॲप कॉल’ लावायला सांगितले; परंतु मी तेव्हा ‘नेट’ चालू न केल्यामुळे ४ – ५ वेळा प्रयत्न करूनही काकूंना आवाज ऐकू येत नव्हता. यात काकूंचा बराच वेळ गेला, तरीही काकूंना राग आला नाही. त्यांनी आम्हाला प्रेमाने आमची चूक समजावून सांगितली.’
८. सौ. अनुश्री केळोदे (पूर्वाश्रमीच्या श्वेता जमनारे), वरोरा
८ अ. प्रसवकळा येत असतांना काकू घरी आल्यावर चैतन्य आणि आनंद जाणवणे : ‘मी बाळंतपणासाठी माहेरी गेले असतांना प्रसुतीच्या आदल्या दिवशी मला प्रसवकळा येत होत्या. त्या वेळी काकू माझ्या घरी आल्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘मला आतून ‘तुझे बाळ बोलवत आहे’, असे वाटले. त्यामुळे मी तुला भेटायला आले.’’ तेव्हा त्यांच्या असण्याने मला प्रसवकळांच्या वेदना जाणवल्या नाहीत. त्या वेळी मला पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवत होता. तेव्हा ‘त्यांना सूक्ष्मातील कळते’, असे माझ्या लक्षात आले.’
९. सौ. दीपाली सिंगाभट्टी, चंद्रपूर
९ अ. ‘काकू सत्संगात मार्गदर्शन करत असतांना मला पुष्कळ आनंद जाणवायचा. मला त्यांच्या बोलण्यातून नेहमीच सकारात्मकता जाणवत असे. त्यांच्याकडून आम्हाला नवनवीन सूत्रे शिकायला मिळत असत.
९ आ. काकूंना कुठल्याही सेवेसंदर्भात संदेश पाठवला किंवा भ्रमणभाष केला, तर त्या व्यस्त असतांनाही लगेच प्रतिसाद देतात. त्यांच्या बोलण्यातून प.पू. गुरुमाऊलींप्रती भाव जाणवतो.’
(क्रमश:)
(सर्व सूत्रांचा दिनांक १५.१२.२०२१)