‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवणाऱ्या कामगारांना सातारा नगरपालिकेची नोटीस !
सातारा, २७ जून (वार्ता.) – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवणाऱ्या कामगारांना नोटीस पाठवली आहे. वास्तविक एकदा गणेशोत्सव झाला की, पुढच्या गणेशोत्सवाची सिद्धता कुंभार त्वरितच चालू करतात; मात्र आता गणेशोत्सवाच्या तोंडावर पालिकेने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवणाऱ्या कामगारांना नोटीस बजावल्यामुळे कामगार असंतोष व्यक्त करत आहेत. (प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीविषयी पूर्वीच सांगायला हवे, हे माहिती असूनही याविषयी प्रशासनाने आधीच नियोजन का केले नाही? हा प्रशासनाचा गलथान कारभार नव्हे का ? – संपादक)
छोट्या-मोठ्या गणेशमूर्ती कुंभारवाड्यात सिद्ध होत असतात. त्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले असून गणेशमूर्ती पंख्याच्या वाऱ्यात वाळवल्या जात आहेत. आता केवळ रंगकाम शिल्लक राहिले आहे. कोरोना महामारी आणि दळणवळण बंदी यांमुळे गत २ वर्षे मूर्तीकाम करणाऱ्या कामगारांच्या हाताला काम नव्हते. हे माहिती असूनही २४ जून या दिवशी अचानक ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींची विक्री करू नये, अशी नोटीस नगरपालिकेच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे. त्यामुळे गणेशमूर्ती सिद्ध करण्यासाठी करण्यात आलेला लाखो रुपयांचा व्यय पाण्यात जातो कि काय ? अशी भीती मूर्तीकार, कुंभार व्यक्त करत आहेत.
संपादकीय भूमिकामूर्तीकारांना पर्याय उपलब्ध करून न देता गणेशोत्सवाच्या तोंडावर त्यांना अडचणीत आणणारे प्रशासन ! |