पालखी सोहळ्याचे ‘ड्रोन कॅमेऱ्या’च्या साहाय्याने चित्रीकरण करण्यास प्रतिबंध !
सातारा, २७ जून (वार्ता.) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून या ठिकाणी ‘ड्रोन कॅमेऱ्या’द्वारे चित्रीकरणास सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
हे प्रतिबंध खासगी दूरचित्रवाहिन्या, खासगी व्यक्ती आणि संस्था आदींसाठी असून २७ जूनच्या रात्री १२ ते ४ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहेत. नीरा नदीतील स्नानानंतर पालखी २८ जून या दिवशी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. पालखी लोणंद, चांदोबाचा लिंब, तरडगाव, काळज, निंभोरे, वडजल, फलटण, विडणी, पिंपरद, निंबळक फाटा, बरड आणि साधुबुवाचा ओढा या मार्गे सकाळचा विसावा, दुपारचे भोजन, दुपारचा विसावा आणि मुक्काम करत मार्गक्रमण करणार आहे.