आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे ४ तात्पुरत्या बसस्थानकांची उभारणी चालू ! – विलास राठोड, विभाग नियंत्रक

यात्रेच्या कालावधीत महामंडळाचे १० ते ११ सहस्र कर्मचारी पंढरपूर येथे कार्यरत असणार !

विलास राठोड

सोलापूर, २७ जून (वार्ता.) – कोरोनाच्या संसर्गानंतर २ वर्षांनी आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी भाविक लाखोंच्या संख्येने पंढरपूर येथे येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातून ४ सहस्र ७०० गाड्यांचे नियोजन केले असून यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी ४ अस्थायी स्थानके उभारण्यात येत आहेत. यात्रा कालावधीत वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मी स्वत: पंढरपूर येथे उपस्थित असणार आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री. विलास राठोड यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’शी बोलतांना दिली.

१. पंढरपूर शहराच्या परिसरात विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या बसगाड्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या अस्थायी स्थानकांवर ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रक बसवण्यात येणार आहेत, तसेच तेथे गाड्यांच्या दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध असणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रत्येक स्थानकावर डॉक्टरांचे आरोग्य पथक, प्रथमोपचार पथक, अग्नीशमन पथक उपलब्ध असणार आहे.

२. आषाढीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात २४० बसगाड्यांचे नियोजन आहे. वारीच्या निमित्ताने राज्यभरातून आणि परराज्यांतूनही आषाढीसाठी बसगाड्या येतात. येणारे बसचालक आणि वाहक यांच्या व्यतिरिक्त महामंडळाचे १० ते ११ सहस्र कर्मचारी पंढरपूर येथे कार्यरत असणार आहेत. कर्मचाऱ्यांचे निवास आणि भोजन यांची सोय महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

अस्थायी स्थानके आणि तेथे येणाऱ्या विविध जिल्ह्यांतील बसगाड्यांचे नियोजन

१. पांडुरंग बसस्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

२. चंद्रभागानगर बसस्थानक – पुणे, सातारा, ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर

३. भीमा बसस्थानक (बार्शी रस्ता) – मराठवाडा आणि विदर्भ

४. विठ्ठल बसस्थानक – नगर, नाशिक, जळगाव आणि धुळे