बिलिव्हर्सचा पास्टर (पाद्री) डॉम्निक यांना गाडीच्या रस्ताकरात दिलेली ३ लक्ष रुपयांची सूट भरण्याचा वाहतूक खात्याचा आदेश

पास्टर डॉमनिक त्याच्या कार आणि पत्नीसह

पणजी, २५ जून (वार्ता.) – धर्मांतराच्या तक्रारींवरून पोलिसांनी कह्यात घेतलेला आणि नंतर जामिनावर सुटका झालेला ‘बिलिव्हर्स’च्या शिवोली येथील फाईव्ह पिलर्स चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्यांची पत्नी जुआंव यांना मर्सिडीज गाडीच्या रस्ताकरावर वाहतूक खात्याने ३ लक्ष १ सहस्र ७७९ रुपये सूट दिली होती. पास्टर डॉम्निक यांनी या सवलतीचा वापर सेवाभावी कामासाठी न करता व्यक्तीगत कामासाठी केला. यास्तव वाहतूक खात्याच्या संचालकांनी पास्टर डॉम्निक यांना त्यांनी खरेदी केलेल्या मर्सिडीज गाडीवर देण्यात आलेली सूट रहित करून हे पैसे भरण्याचा आदेश दिला आहे.

शासनाने १५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी एक विशेष अधिसूचना काढून पास्टर डॉम्निक यांच्या मर्सिडीज गाडीच्या खरेदीवर रस्ता करात सूट दिली होती. ही सूट दिल्याने सरकारचे ३ लक्ष १ सहस्र ७७९ रुपये बुडल्याचे ताशेरे महालेखापालांनी त्यांच्या अहवालात ओढले होते. मर्सिडिज गाडीची किंमत ३० लक्ष १७ सहस्र ७७२ रुपये आहे. गाडीचा वापर सेवाभावी कामासाठी केल्यास रस्ताकराच्या शुल्कात सूट दिल्यास चालते; मात्र पास्टर डॉम्निक यांनी मर्सिडीज गाडी व्यक्तीगत कामासाठी वापरली आणि त्यामुळे रस्ताकराच्या शुल्कात दिलेली सूट अनधिकृत ठरते. ही सूट रहित करण्यात येत असल्याने पास्टर डॉम्निक यांनी वर्ष २०१४ पासून आतापर्यंतचा थकित रस्ताकर जमा करावा, असा आदेश वाहतूक खात्याने काढला आहे.

संपादकीय भूमिका

रस्ताकरात सूट कोणत्या आधारे दिली याची चौकशी होऊन तत्कालीन उत्तरदायींवरही कारवाई व्हायला हवी !