सर्वांना प्रेमाने आपलेसे करणार्या सनातनच्या १०९ व्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे !
‘डॉ. सुधाकर आणि डॉ. (सौ.) शरदिनी कोरे (आताच्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे) यांच्या मिरज येथील वास्तूत, ‘कोरे हॉस्पिटल’ येथे डिसेंबर १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सांगली-कोल्हापूर आवृत्तीचा शुभारंभ झाला. वर्ष २००६ पर्यंत या वास्तूत दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय विनामूल्य चालू होते.
वर्ष २००३ मध्ये मी मिरज आश्रमात गेल्यावर माझी कोरेकाकू यांच्याशी ओळख झाली. एक प्रथितयश स्त्रीरोगतज्ञ असूनही कोरेकाकू आम्हा मुलींसोबत आश्रमातील एका खोलीत रहायच्या. त्या वेळी त्या प्रसारात सेवा करायच्या. दिवसभर प्रसारात सेवा करत असूनही त्या आश्रमात आल्यावर आम्हा सर्वांची प्रेमाने चौकशी करायच्या, तसेच आम्हाला काही हवे-नको ते पहायच्या. एखादा साधक रुग्णाईत असेल, तर त्या स्वतः साधकाला आधुनिक वैद्यांकडे घेऊन जायच्या. कोरेकाकू तो साधक पूर्ण बरा होईपर्यंत स्वतः त्याच्या औषधोपचाराकडे लक्ष द्यायच्या. ‘एखादी श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती इतकी साधी अन् प्रेमळ असू शकते ! ’, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे आहेत.
वर्ष २०१० नंतर वर्ष २०२२ मध्ये पू. कोरेकाकू रामनाथी आश्रमात आल्यावर माझी त्यांच्याशी भेट झाली. १२ वर्षांनंतर भेटूनही त्यांनी मला ओळखले. आता त्या ‘संत’ झाल्या असूनही त्यांनी मला अगोदरप्रमाणेच प्रेमाने जवळ घेतले आणि माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवला. असे संतरत्न घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्या चरणी शतश: नमन ! ’
– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०२२)