आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
(भाग २१)
घराच्या भिंतींचा रंग आणि सजावट सात्त्विक असण्याचे महत्त्व !
११ जून २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘असात्त्विक स्वरूपाची नक्षी आपल्या घरातील भिंतीवर नाही ना’, याविषयीचे सूत्र वाचले. आज त्या पुढचे सूत्र देत आहोत.
४. वास्तूतील स्पंदनांविषयी आलेले अनुभव
यासंबंधी मी धर्मप्रसाराच्या वेळी अनेक अनुभव घेतलेले आहेत. याविषयीची अनुभूती येथे देते.
४ अ. मुलाच्या वागण्यामुळे त्रस्त झालेल्या महिलेच्या घरी जाणे आणि मुलाच्या खोलीत काळ्या रंगाची असात्त्विक पद्धतीने सजावट केलेली असल्यानेच त्याच्या मानसिक त्रासांत वाढ होत असणे : ऑगस्ट २०१२ मध्ये मी नवी मुंबईमध्ये एका साधकाच्या घरात सत्संग घेत होते. तेथे आलेली एक महिला सत्संग लक्षपूर्वक ऐकत होती. सत्संगानंतर ती मला म्हणाली, ‘‘तुम्ही वास्तूसंबंधी जी सूत्रे सांगितली, त्याची अनुभूती मी स्वतः घेत आहे. आपण कृपया घरी येऊन माझ्या तरुण मुलाला हे सर्व समजावून सांगावे. आम्ही दोघे (पती-पत्नी) त्याच्या वागण्यामुळे पुष्कळ व्यथित झालो आहोत.’’ मी सूक्ष्मातून अभ्यास करण्याच्या दृष्टीने त्यांच्या घरी गेले. त्यांच्या मुलाच्या खोलीत गेल्यावर मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्या संपूर्ण खोलीची गृहसजावट (इंटिरियर्स) सोनेरी आणि काळ्या रंगात केली होती. त्यामध्ये काळा रंग ८० टक्के एवढा होता. ती खोली पहाताच मी त्यांना विचारले, ‘‘तुमचा मुलगा तांत्रिक साधना करतो का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तो कोणतीच साधना करत नाही. तो अत्यंत हट्टी आणि अहंकारी आहे. आमचे काहीच ऐकत नाही. आम्ही त्याच्यासाठी आतापर्यंत लक्षावधी रुपये खर्च केले. आम्ही काही बोललो, तर तो आत्महत्या करण्याची धमकी देतो. त्याला निराशा येते, तेव्हा तो स्वतःच्या खोलीतच पडून रहातो.
जेव्हापासून त्याने या खोलीची गृहसजावट करवून घेतली आहे, तेव्हापासून त्याचे मानसिक त्रास पुष्कळ अधिक प्रमाणात वाढले आहेत.’’ त्यामुळे वास्तूविषयीच्या सूक्ष्म ज्ञानावरील माझा विश्वास आणखीन वाढला.
(क्रमश:)
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (१०.२.२०२२)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |