हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य स्वतःचे असून त्यात पुढाकार घेऊन कार्य करायला हवे !
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे समारोपीय मार्गदर्शन
दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत पार पडले. या अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना समारोपाचे मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
१. ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे महत्त्व
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त आपण ७ दिवस एकत्रित राहिलो. आपल्या सर्वांचा परिचय झाला. आपल्या सर्वांमध्ये कुटुंबभावना निर्माण झाली आहे. हे सर्व या अधिवेशनाचे यश म्हणावे लागेल. आपले प्रांत वेगळे आहेत, आपल्या भाषा वेगळ्या आहेत. आपल्या संस्था वेगळ्या आहेत. आपल्या कार्यशैली वेगळ्या आहेत; पण आपल्या सर्वांचे लक्ष्य एकच आहे, ते म्हणजे हिंदु राष्ट्र !
आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समविचारी हिंदु शक्तींचे एकत्रीकरण करायचे आहे. सध्याच्या अत्यल्प काळात १०० कोटी हिंदूंचे संघटन केवळ अशक्य आहे. त्यामुळे ज्यांच्या मनात हिंदु राष्ट्र आहे, अशा सर्व समविचारींचे संघटन करण्यास प्राधान्य द्यायचे आहे. असे संघटन जेथे जेथे निर्माण झाले आहे, तेथून वीस-पंचवीस किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील हिंदु सुरक्षित झाला पाहिजे. तेथील माता-भगिनी सुरक्षित झाल्या पाहिजेत. तेथील मंदिरे सुरक्षित झाली पाहिजेत. तेथे धर्मांध वृत्तीला अपराध करण्याचे धाडसच होता कामा नये, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे, तर या हिंदूऐक्याची खरी शक्ती आपल्याला अनुभवता येईल.
आजकाल १०० हून अधिक हिंदू एकत्र आले की, ‘बहुसंख्यांक हिंदूंची झुंडशाही आहे’, अशा बातम्या प्रसारित होतात ! या अधिवेशनाच्या पूर्वीही हिंदु संघटनांच्या एकत्रीकरणाला ‘बहुसंख्यांकांची झुंडशाही’ असे संबोधले गेले आहे. अशांकडे दुर्लक्ष करा ! ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द उच्चारला की, या तथाकथित सेक्युलरवाद्यांना (निधर्मीवाद्यांना) पोटशूळ उठतो. ते तर्हेतर्हेचे प्रश्न विचारू लागतात की, हिंदु राष्ट्र कसे आणणार ? निवडणुका लढवणार का ? हिंदु राष्ट्रात अल्पसंख्यांकांचे काय होणार ? वगैरे वगैरे.
अशांसाठी केवळ ‘समविचारी संघटनांची एकी’, हेच उत्तर आहे. जेव्हा ही हिंदु राष्ट्राने प्रेरित सकल हिंदुशक्ती एकत्रित दिसेल, त्या क्षणी हे हिंदु राष्ट्र होऊन जाईल. त्यासाठी कुठल्या निवडणुकांची आवश्यकता रहाणार नाही किंवा कुणाच्या बौद्धिक प्रश्नांची उत्तरे देण्याचीही आवश्यकता रहाणार नाही.
सहस्रोंच्या संख्येने हिंदू एकत्रित होतात, तेव्हा विश्वकल्याणाचे कार्य करतात, हा इतिहास आहे. त्यामुळे आपल्या एकत्र येण्याने आणि रहाण्याने शुभकल्याण होईल, याची निश्चिती बाळगा !
२. आम्हाला धर्माधारित हिंदु राष्ट्र हवे आहे !
केवळ भारत घटनात्मक हिंदु राष्ट्र बनल्याने हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण होणार नाही. आपल्याला या लोकशाहीत धर्माधारित हिंदु राष्ट्राचे बीजारोपण करावे लागणार आहे. सनातन धर्मग्रंथांमध्ये राजधर्म सांगितला आहे. तेथे धर्माच्या सीमेबाहेर राजकारण नाही. धर्माच्या सीमेबाहेर राजकारण असेल, तर त्याचे नाव ‘उन्माद’ आहे, जो भारतात गेल्या ७० वर्षांपासून अस्तित्वात आहे. जोपर्यंत धर्माधारित राज्यकारभार होत नाही, तोपर्यंत गायी, गंगा, सती, वेद, सत्यवादी, दानशूर आदींचे संपूर्ण संरक्षण होऊ शकत नाही.
सध्याच्या लोकशाहीत तर चार्वाकाला अपेक्षित असलेले नास्तिकांचे राज्यही नाही. चार्वाकाने नास्तिकांना काय म्हटले होते, ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।’, म्हणजे ‘कर्ज घेऊन तूप खा !’ याचा अर्थ येथे ‘कर्ज परत देण्याचे कर्तव्य आहे’, ‘लूटमार, भ्रष्टाचार करा’, असे म्हटलेले नाही आणि ‘कर्ज का काढायचे आहे ?’, तर तूप खाण्यासाठी, अर्थात् सात्त्विक आहारासाठी ! मद्य पिण्यासाठी नाही !! सध्याच्या लोकशाहीत जनतेच्या पैशांची लुटालूट करण्यास पूर्ण मोकळीक आहे. राजकीय वर्ग आणि प्रतिष्ठित वर्गच काय, सामान्य जनताही मद्याच्या आहारी आहे. थोडक्यात सध्याच्या लोकशाहीत नास्तिकांचे स्वच्छ शासनही नाही ! हिंदु राष्ट्र, वैदिक राष्ट्र, सनातन राष्ट्र या गोष्टी पुष्कळ दूर आहेत; पण हे धर्माधारित हिंदु राष्ट्र आणणार तरी कोण ? तुम्ही-आम्हीच आणणार ना ! त्यामुळे आपल्यासारखे ४००-५००, सहस्रो, दशसहस्रो, लाखो व्यक्ती जेव्हा समर्पित होतील, तेव्हा हिंदु राष्ट्र-स्थापनेचा मार्ग प्रशस्त होईल.
३. समान कृती कार्यक्रम
या अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा झाल्या. अनेक प्रस्ताव पारित झाले. हिंदु राष्ट्र संसदेतून चिंतनमंथन झाले. गटचर्चांतून कृती दिशा निश्चित करण्यात आली. आता या अधिवेशनानंतर सर्वत्र राबवायचा ‘समान कृती कार्यक्रम’ आपण पाहूया.
३ अ. वैचारिक पातळीवर हिंदु राष्ट्राचा विचार प्रसारित करा ! : सध्याचा काळ हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी वैचारिक स्तरावर धु्रवीकरण करण्यासाठी अनुकूल आहे. हे लक्षात घेऊन आपण स्वतः ‘हिंदु राष्ट्र’ या विषयाची प्रभावी मांडणी करणारे अभ्यासू वक्ते बना; तसेच लेखन, सोशल मिडिया आदींमधून वैचारिक कार्य करा !
३ आ. हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे उपक्रम राबवा ! : हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे उपक्रम राबवणे, हा आपला प्रमुख समान कृती कार्यक्रम असेल. आपल्या कार्यक्षेत्रात आणि प्रांतात जे काही हिंदुत्वाचे उपक्रम राबवले जातील, ते आपण हिंदु राष्ट्राची दिशा ठेवून राबवूया. हिंदु राष्ट्राचा विषय लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपण गावागावांत बैठका, सभा, तसेच शहरांमध्ये परिसंवाद आयोजित करू शकतो. यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’ तुम्हाला साहाय्य करील.
३ इ. हिंदु संघटनांच्या गळचेपीच्या विरोधात ‘आम्ही एकशे पाच’ हा भाव ठेवून लढा द्या ! : सर्व राजकीय पक्ष आणि सर्व धर्मद्वेष्टे हे हिंदु संघटनांच्या विरोधात कार्यरत असतात. भविष्यात कुठल्याही हिंदु संघटनेच्या विरोधात प्रसंग घडल्यास हिंदुत्वनिष्ठांच्या रक्षणासाठी पांडवांप्रमाणे ‘आम्ही एकशे पाच’ असा विचार करून त्यांचा बचाव करावा लागेल !
३ ई. हिंदुत्वाच्या आणि हिंदु राष्ट्राच्या चळवळी यांमध्ये समन्वय स्थापित करा ! : सध्या देशभर सर्वत्र हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र यांच्या संदर्भात विविध चळवळी चालू झाल्या आहेत. पुरीच्या शंकराचार्यांचे ‘हिंदु राष्ट्रसंघ’, प्रयाग धर्मसंसदेची हिंदु राष्ट्र राज्यघटना बनवण्याची प्रक्रिया, काशी विद्वत परिषदेची ‘संस्कृती संसद’, देहली येथील ‘इक्वल राईट्स मुव्हमेंट’ आणि ‘हिंदु इकोसिस्टीम मुव्हमेंट’, दक्षिण भारतातील ‘सेव्ह टेंपल्स’ आणि ‘रिक्लेम टेंपल्स’ चळवळी अशा हिंदुत्वाच्या अन् हिंदु राष्ट्राच्या दिशेने शेकडो चळवळी संपूर्ण भारतात चालू आहेत. या चळवळींमध्ये अनेक संघटना आणि विद्वत्जन जोडलेले आहेत. या चळवळींचा समन्वय स्थापित करणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने संपूर्ण भारतात सर्वत्र ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जाणार आहे, त्यात एक संघटना म्हणून सहभाग नोंदवा !
४. कालप्रवाह समजून घ्या !
हिंदुत्वासाठी असो कि हिंदु राष्ट्रासाठी, काळ अनुकूल होत आहे. हा कालप्रवाह समजून घ्ोऊन आपण कृती केल्या, तर कार्याची फलनिष्पत्ती वाढणार आहे.
४ अ. काळानुसार होणार्या ध्रुवीकरणाला हिंदु राष्ट्राची दिशा द्या ! : सद्यःस्थितीत आपण सर्व जण मोठ्या प्रमाणात देशप्रेमी-धर्मप्रेमी विरुद्ध देशद्रोही-धर्मद्रोही असे धुव्रीकरण अनुभवत आहोत. हे ध्रुवीकरण केवळ राजकीय पक्षांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर प्रसारमाध्यमे, ‘बॉलीवूड’, विद्यापिठे, एवढेच काय सरकारी कार्यालयांमध्येही हे ध्रुवीकरण चालू झाले आहे. आज कधी नव्हे एवढी जागरूकता हिंदु समाजामध्ये निर्माण झाली आहे. प्रसारमाध्यमांनी हिंदुहानीच्या घटना लपवल्या, तरी ‘सोशल मिडिया’ने त्या घटना प्रसारित केल्याने आजचा हिंदु जागरूकपणे विचार करू लागला आहे. प्रतिकूल काळातील या अनुकूलतेद्वारे जागरूक आणि विचारी समाजाला कोण्या एका राजकीय पक्षाकडे नव्हे, तर हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेकडे घेऊन जाणे, हे आपले या काळातील कर्तव्य आहे.
४ आ. कालप्रवाह हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल होत आहे, हे लक्षात घ्या ! : ‘जसजशी धर्माची संस्थापना होऊ लागते, तसतशी धर्माच्या एकेका अंगाचा उत्कर्ष होऊ लागतो’, हा आध्यात्मिक सिद्धांत आहे. राममंदिराच्या उभारणीला प्रारंभ झाल्यानंतर केंद्रीय सत्तांनी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ (धार्मिकस्थळे कायदा) हा कायदा रहित न करता आणि ज्ञानवापीला धक्का न लावता ‘श्री काशी विश्वेश्वर-गंगा कॉरिडॉर’ची उभारणी केली. या कार्याचा धुमधडाक्यात प्रचार करण्यात आला; परंतु काळाला काही तरी वेगळे अपेक्षित होते. कालप्रवाहाने पुन्हा न्यायालयात ज्ञानवापीच्या सूत्रावर चर्चा चालू केली. त्यातून सर्वेक्षण झाले आणि तेथे देवतांची शिल्पे अन् शिवलिंग प्रकटले. आता या घटनेनंतर हे सत्य न्यायालयेही नाकारू शकत नाहीत आणि केंद्रीय शासनकर्ते त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, अशी स्थिती उत्पन्न झाली आहे. कालप्रवाह हिंदूंसाठी अनुकूल होत आहे, हाच यातून एकमेव बोध आहे, हे लक्षात घ्या ! अगदी १० वर्षांपूर्वी आम्ही हिंदु राष्ट्राचे पहिले अधिवेशन आयोजित केले होते. तेव्हा सर्व जण साशंक दृष्टीने ‘हिंदु राष्ट्र’ शब्दप्रयोगाकडे पहात होते. आज १० वर्षांनी संसदेत असो कि जनसंसदेत असो, ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द प्रचलित झाला आहे. म्हणूनच म्हणतात, ‘कालाय तस्मै नमः ।’
४ इ. कालप्रवाहातील १०० वर्षांच्या पुनरावृत्तीचा सिद्धांत लक्षात ठेवा ! : वर्ष १९२० मध्ये ‘स्पॅनिश फ्लू’मुळे १ कोटी ८० लाख लोकांचा मृत्यू झाला होता. वर्ष २०२० पासून चालू असलेल्या कोविड महामारीमुळे आतापर्यंत ६३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ष १९४१ मध्ये भारतातील मुसलमानांची जनसंख्या २४ टक्के होती. आता वर्ष २०२२ मध्ये ती पुन्हा २० टक्के झाली आहे. त्या वेळी त्यांनी पाकिस्तानचा ठराव संमत केला, आता ते पुन्हा वेगळ्या इस्लामी भूमीची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे कालप्रवाहातील १०० वर्षांच्या पुनरावृत्तीचा सिद्धांत लक्षात ठेवून सतर्क बनले पाहिजे.
५. भीषण भविष्यकाळ
सध्याच्या काळात जग आणि भारत यांवर संकटांची त्सुनामी आली आहे. संपूर्ण विश्व संक्रमणावस्थेतून जात आहे.
५ अ. विश्वयुद्ध : रशिया-युक्रेन युद्धाने जगाचा प्रवास विश्वयुद्धाकडे चालू झाला आहे. या युद्धात रशिया निष्प्रभ होत असला, तरी हा आण्विक देश आहे, हे जगाने विसरता कामा नये. चीन-तैवान युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. जग पुन्हा एकदा दोन युद्धजन्य समूहात विभागले जात आहे. आज भारत आंतरराष्ट्रीयदृष्ट्या तटस्थ असला, तरी उद्या कुठल्या तरी एका बाजूने युद्धात सहभाग नोंदवावा लागणार आहे. वर्तमान स्थिती पहाता, हे युद्ध खूप दूर असल्याचे वाटत नाही.
५ आ. आर्थिक मंदी : हे यापुढील मोठे संकट असणार असून जागतिक अन्नधान्याची टंचाई, इंधनाची न्यूनता आणि आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत. या आर्थिक मंदीच्या पर्वाला प्रारंभ होण्यापूर्वीच श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान आदी देशांच्या अर्थव्यवस्था कोसळू लागल्या आहेत. अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनी हे देशही प्रथमच आर्थिक अडचणी अनुभवत आहेत. अफगाणिस्तानमध्ये तर भूकबळी आणि कुपोषणाला प्रारंभ झाला आहे, तर श्रीलंकेत खाद्यान्नाचे भाव गगनाला भिडून अराजक माजले आहे. भारताचीही परिस्थिती पुष्कळ चांगली आहे, अशी स्थिती नाही. ज्या दिवशी वैश्विक युद्ध चालू होईल, त्या दिवशी भारतही आर्थिक संकटात असेल.
५ इ. गृहयुद्ध : जगभरात विश्वयुद्ध चालू झाले की, भारतातील देशविरोधी शक्ती जाती-धर्म यांच्या नावावर गृहयुद्ध भडकवण्याचे षड्यंत्र रचण्याची शक्यता आहे. वर्ष १९४७ मध्ये ज्या प्रकारे जातीय दंगली झाल्या होत्या, त्याप्रमाणे भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जवळजवळ प्रत्येक रस्त्यावरच हे युद्ध लढले जाईल. केरळ राज्यातील ‘पॉप्युलर फ्रंट’च्या मोर्च्यात एका लहान मुलाने घोषणा दिल्या की, ‘हिंदूंनी आता आपल्या अंतिम संस्कारासाठी तांदुळ गोळा करून ठेवले पाहिजेत आणि ख्रिस्त्यांनी त्यांच्या अंतिम संस्कारासाठी ‘धूप’ ठेवला पाहिजे. तुम्ही आमच्या भूमीत शांततेत रहा, तरच शांततेत जगू शकता, अन्यथा आम्ही काश्मीरप्रमाणे ‘आझादी’ कशी मिळवायची ते जाणतो.’ या प्रक्षोभक घोषणा देतांना ना पोलिसांनी त्याला अडवले, ना संघटनेच्या प्रमुखांनी !
५ ई. अराजकता : यापुढे राजकीय अराजकता हळूहळू वाढत जाईल. केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकारे यांच्यातील संबंध विकोपाला गेल्याचे आपण अनुभवतच आहोत. राहुल गांधी यांनी संसदेत आणि आता इंग्लंडमध्ये जाऊन ‘भारत राष्ट्र नाही, तर राज्यांचा संघ आहे’, असे केलेले विधान फुटीरतावादाला प्रोत्साहन देणारे आहे. हिंदी भाषेच्या अनिवार्यतेवरील गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे दक्षिण भारतात प्रतिदिन फुटीरतावादी वक्तव्ये केली जात आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणारे हे अराजक कुठलाही स्वार्थी राजकीय पक्ष रोखू शकणार नाही, हे लक्षात घ्या !
जेव्हा अराजकता निर्माण होते, तेव्हा देशाच्या आंतरिक आणि बाह्य सीमा असुरक्षित होतात. थोडक्यात अशा वेळी सीमेपलीकडून आक्रमण आणि गृहयुद्ध यांचा धोका असतो. अशा काळात सीमेवरील सैनिक भारताचे रक्षण करतीलच; पण आंतरिक सुरक्षेसाठी आपण सर्व देशभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना शारीरिक स्तरावर कार्य करावे लागेल !
५ उ. युद्धकाळात सत्त्वगुणी लोकांचे रक्षण करा ! : दक्षिण भारतातील भविष्यकथन करणार्या अनेक नाडीपट्टिकांमध्ये म्हटले आहे, ‘तिसर्या विश्वयुद्धात पृथ्वीवरील अर्धी लोकसंख्या नष्ट होईल.’ अशा वेळी ‘कुटुंबीय, नातेवाइक, मित्र’, असा विचार न करता राष्ट्र-धर्म यांसाठी काहीतरी करणारे आणि सत्त्वगुणी, अर्थात् धर्मपरायण असलेल्या सज्जन लोकांचेच रक्षण करा. पुढे हेच सत्त्वगुणी लोक हिंदु राष्ट्राला पूरक ठरतील.
६. हिंदु राष्ट्र-स्थापनेतील साधनेचे महत्त्व लक्षात घ्या !
आपण शारीरिक -मानसिक-बौद्धिक पातळीवर हिंदु राष्ट्राचे कार्य करत आहोत. ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ या धर्मवचनानुसार आपले रक्षण प्रत्यक्ष भगवंतच करत असतो. आज सूक्ष्मातून अनेक संत आपल्या रक्षणार्थ कार्य करत आहेत. आपण हिंदु राष्ट्राचे स्थुलातील कार्य करत असतो, तेव्हा सूक्ष्म-जगतातील हेच कार्य अनेक संत करत असतात. काही संत यज्ञयाग, अनुष्ठाने यांद्वारेही हेच कार्य आध्यात्मिक स्तरावर करत आहेत. त्यामुळे आपण जिवंत आहोत. हे लक्षात घेऊन आपणही ईश्वराची आराधना म्हणून नामजपादी साधना केली पाहिजे, म्हणजे आपल्याभोवती संरक्षक कवच निर्माण होईल आणि संतांची साधना अन् यज्ञयाग यांमुळे निर्माण होणारी शक्ती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिक प्रमाणात वापरली जाईल. थोड्याच काळात युद्धाची भयंकर दरी येणार आहे, ज्याच्याजवळ भगवंताच्या नामाचे सामर्थ्य असेल, तोच जगेल. त्यामुळे राम, कृष्ण, शिव, नारायण इत्यादींपैकी कुणाच्याही नावाचे नित्य स्मरण करत रहा !
७. हिंदु राष्ट्राच्या कार्यात पुढाकार घ्या !
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन ठेवू नका, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन ठेवायला हवा ! हे धर्मसंस्थापनेचे ईश्वरीय कार्य आहे. जेव्हा ईश्वर अवतार घेऊन कार्य करतो, तेव्हा भक्त या कार्यात आपली साधना म्हणून सहभागी होतात. त्यामुळे जे कार्यात सहभागी होतील, त्यांची आध्यात्मिक उन्नती, तसेच मृत्यूनंतरची पारलौकिक उन्नती सुलभतेने होईल. त्यामुळे माझी सर्वांनी विनंती आहे की, या हिंदु राष्ट्राकडे तटस्थ होऊन पाहू नका. या कार्यात पुढाकार घेऊन कार्य करा !
– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे