पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी ‘पथकर’ नाक्यावर पथकर चालूच रहाणार !
कोल्हापूर, २५ जून (वार्ता.) – पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी (तालुका हातकणंगले) येथील पथकर नाक्यावरील खासगी आस्थापनाचा पथकर वसुलीचा कालावधी २४ जून या दिवशी संपला. आता हा महामार्ग आणि पथकर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला आहे. हस्तांतरित झाल्यानंतरही पथकर चालूच रहाणार असून प्रवाशांना दिलासा देण्याऐवजी चारचाकीसाठी १० रुपये, तर अवजड वाहनांसाठी १५ रुपये दरवाढ लादण्यात आली आहे.
‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’, या तत्त्वावर राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गाचे चौपदरीकरण करून वर्ष २००५ मध्ये किणी (कोल्हापूर) आणि तासवडे (सातारा) येथे पथकर नाके उभे करून पथकर घेण्यास अनुमती दिली होती. याचा कालावधी मे २०२२ मध्ये संपल्यानंतर कोरोना आणि महापूर यांमुळे खासगी आस्थापनास याचा कालावधी ५३ दिवसांनी वाढवून देण्यात आला होता. आता यापुढील काळात २४ घंट्यांत परतीच्या प्रवासासाठी दुपटीऐवजी दीडपट पथकर द्यावा लागणार आहे.