योगासने आणि प्राणायाम यांचा होणारा लाभ ते नामजपासहित केल्याने अधिकच वाढतो !
‘आंतरराष्ट्रीय योग दिवसा’च्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले संशोधन
२१ जून हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आज जगभरातील बहुतांश देशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात योगासने आणि प्राणायाम शिकवणारे वर्ग चालू आहेत. या वर्गांची वाढती लोकप्रियता लोकांना त्यांचा लाभ होत असल्याचे निदर्शक आहे. योगासने आणि प्राणायाम यांचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर होणार्या लाभाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या आधुनिक वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या चाचणीची माहिती या लेखात देत आहोत.
‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) हे उपकरण माजी अणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी विकसित केले आहे. ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू, प्राणी किंवा व्यक्ती यांच्यातील नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजता येते. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु सकारात्मक ऊर्जा असेलच, असे नाही. |
१. सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे न घेता’ आणि ‘सूर्याची नावे घेऊन’ घातल्याचा व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर होणार्या परिणामाचा अभ्यास
आजच्या धकाधकीच्या जीवनात विविध योगासने करायला वेळ मिळत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. यावर सूर्यनमस्कार घालणे हा उत्तम पर्याय आहे; कारण एक सूर्यनमस्काराच्या अंतर्गत एकूण १२ योगासने येतात. त्यामुळे योगासनांचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर होणारा लाभ अभ्यासण्यासाठी सूर्यनमस्काराची निवड करण्यात आली.
१ अ. सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे न घेता’ आणि ‘सूर्याची नावे घेऊन’ घातल्याचा व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर होणार्या परिणामाचा ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाच्या माध्यमातून केलेला अभ्यास : हा अभ्यास १ पुरुष आणि १ स्त्री अशा २ साधकांवर करण्यात आला. यासाठी पुढीलप्रमाणे चाचणी करण्यात आली.
१. सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी दोघांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. ही त्यांच्या ‘मूळ स्थिती’ची नोंद होय.
२. त्यानंतर दोघांनीही प्रत्येकी १२ सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे न घेता’ घातल्यावर त्यांच्या पुन्हा ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या नोंदींतून त्यांच्यावर सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे न घेता’ घातल्याचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर झालेला परिणाम लक्षात आला.
३. दुसर्या दिवशी दोघांची परत ‘मूळ स्थिती’ची नोंद केल्यावर त्यांनी १२ सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे घेऊन’ घातले. त्यानंतर त्यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या नोंदींतून त्यांच्यावर सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे घेऊन’ घातल्याचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर झालेला परिणाम लक्षात आला.
वरील चाचणीतील मोजण्यांच्या नोंदी पुढीलप्रमाणे होत्या.
वरील सारणीतून पुढील सूत्रे स्पष्ट होतात.
१. पुरुष साधकामध्ये सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी असलेली नकारात्मक ऊर्जा त्याने सूर्यनमस्कार दोन्ही प्रकारे घातल्यानंतर पूर्णतः नाहीशी झाली.
२. पुरुष साधकामधील सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी असलेली सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘सूर्याची नावे न घेता’ ते घातल्यावर २.३९ मीटरने वाढली, म्हणजे दुप्पटपेक्षा अधिक वाढली. त्याने ते ‘सूर्याची नावे घेऊन’ घातल्यावर ४.१७ मीटर अशी त्याहूनही अधिक वाढली.
३. स्त्री साधिकेमध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हतीच. तिच्यामध्ये सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी असलेली सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘सूर्याची नावे न घेता’ ते घातल्यावर ३.०५ मीटरने वाढली, म्हणजे दुपटीपेक्षा अधिक वाढली. तिने सूर्यनमस्कार ‘सूर्याची नावे घेऊन’ घातल्यानंतर ४.६६ मीटर अशी त्याहूनही अधिक वाढली.
२. ‘नामजप न करता’ आणि ‘नामजप करत’ प्राणायाम केल्याचा व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर होणार्या परिणामाचा अभ्यास
हा अभ्यास करण्यासाठी ‘अनुलोम-विलोम’ हा प्राणायामाचा प्रकार निवडण्यात आला.
२ अ. ‘अनुलोम-विलोम’ प्राणायाम केल्याचा व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर होणार्या परिणामाचा ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाच्या माध्यमातून केलेला अभ्यास : हा अभ्यास ‘सूत्र क्र. १ इ’ मधील चाचणीतील १ पुरुष आणि १ स्त्री अशा २ साधकांवर करण्यात आला. यासाठी पुढीलप्रमाणे चाचणी करण्यात आली.
१. सूर्यनमस्कार घातल्यानंतर मोजण्यांच्या नोंदी केल्यानंतर १० मिनिटे शवासन करून पुन्हा दोघांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. ही त्यांची प्राणायामाचा परिणाम अभ्यासण्यासाठी केलेल्या चाचणीसाठी ‘मूळ स्थिती’ होती.
२. त्यानंतर दोघांनीही प्रत्येकी ९ वेळा ‘नामजप न करता’ अनुलोम-विलोम हा प्राणायाम केल्यानंतर त्यांच्या पुन्हा ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
३. दुसर्या दिवशी दोन्ही व्यक्तींच्या ‘मूळ स्थिती’ची नोंद करण्यात आली. त्यानंतर परत त्यांनी अनुलोम-विलोम हा प्राणायाम ‘नामजप करत’ केल्यावर त्यांच्या पुन्हा ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
वरील चाचणीतील मोजण्यांच्या नोंदी पुढीलप्रमाणे होत्या.
वरील सारणीतून पुढील सूत्रे स्पष्ट होतात.
१. दोन्ही साधकांमध्ये ‘अनुलोम-विलोम’ प्राणायाम करण्यापूर्वी आणि नंतर नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२. पुरुष आणि स्त्री साधक यांनी नामजप न करता प्राणायाम केल्यानंतर त्यांची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अनुक्रमे २.६९ अन् २.४७ मीटरने, म्हणजे दीडपटपेक्षा अधिक वाढली. दोघांनी ‘नामजप करत’ प्राणायाम केल्यानंतर ती अनुक्रमे ५.९९ आणि ५.४३ मीटरने, म्हणजे दुप्पटीपेक्षा अधिक वाढली.
३. चाचणीचा निष्कर्ष
सूर्यनमस्कार आणि अनुलोम-विलोम प्राणायाम केल्याचा आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ होणे; परंतु दोन्ही प्रकार नामजपासहित केल्याने सर्वाधिक लाभ होणे : या चाचणीतून सूर्यनमस्कार घातल्यामुळे आणि अनुलोभ-विलोम हा प्राणायाम केल्यामुळे सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर होणारा लाभ लक्षात आला. हा लाभ सूर्यनमस्कार आणि प्राणायाम नामजप करीत केल्यावर अधिकच वाढतो, हेही स्पष्ट झाले. हे लाभ पहाता, ५००० वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी कोणत्याही बाह्य, स्थूल उपकरणाच्या आधारावाचून अद्वितीय अशी योगासने आणि प्राणायाम यांची निर्मिती केली, हे लक्षात येते. यांना चैतन्यमय नामजपाची जोड दिल्यावर लाभात होणारी वृद्धी पहाता, आपल्या ऋषीमुनींप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात आणि त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायला होते. या चाचणीतून नामजपासहीत योगासने आणि प्राणायाम केल्याचा लाभ लक्षात घेऊन अधिकाधिक व्यक्ती यांना नामजपासहीत आपल्या दिनचर्येत अंतर्भूत करून घेवोत, ही ईश्वचरणी प्रार्थना !’
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.६.२०२०)
(सविस्तर लेख https://bit.ly/3HNSq69 वर वाचा !)