घरच्या घरी करा बटाट्यांची लागवड
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
बटाटे हे घरच्या बागेत सहजपणे घेता येणारे पीक म्हणून ओळखले जाते. बटाटे हे सहज येणारे आणि अत्यंत अल्प व्ययाचे पीक आहे. बटाट्याचे पीक आपण कुंड्या, प्लास्टिक पिशव्या, गोणपाट, उशांचे जुने अभ्रे किंंवा खोळी यांतही घेऊ शकतो.
१. बटाटा लागवडीसाठी कुंड्यांपेक्षा गोण्या जास्त उपयुक्त
बटाटा लागवडीसाठी कुंड्यांपेक्षा ३० किंवा ५० किलो धान्याच्या गोण्या किंवा गोणपाट वापरले, तर अधिक उत्पन्न मिळू शकेल; कारण गोण्यांमध्ये बटाटे वाढण्यासाठी कुंड्यांपेक्षा अधिक मोकळी जागा मिळते. बटाटा लागवडीसाठी २० लिटरच्या पाण्याच्या बाटल्याही वापरता येतात.
२. उन्हाची आवश्यकता
बटाट्यांच्या पिकाला प्रतिदिन न्यूनतम ५ – ६ घंटे थेट उन्हाची आवश्यकता असते. त्यामुळे बटाट्यांची लागवड पुरेसे ऊन येईल, अशा ठिकाणी करावी.
३. माती आणि सेंद्रिय खत
बटाट्यांना आम्लीय (अॅसिडिक) माती अधिक मानवते. यासाठी मातीच्या प्रमाणाएवढेच कंपोस्टही (एक प्रकारचे सेंद्रिय खत) घ्यावे. बटाटे लावण्यासाठी गोणी किंवा पिशवी घेणार असाल, तर पिशवीची वरची कडा बाहेरच्या बाजूने वळवत नेऊन अर्ध्याच्याही खाली न्यावी. खालच्या भागात साधारणपणे ४ इंचांपर्यंत माती आणि कंपोस्ट यांचे मिश्रण भरून घ्यावे. त्यावर हलकेसे पाणी शिंपडून ते ओलसर करून घ्यावे.
४. बटाट्यांची निवड आणि लागवड
पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये बटाट्यांमधून अंकुर फुटलेले दिसतात. या अंकुरांना ‘डोळे’ म्हणतात. उन्हाळ्यात असे अंकुर फुटलेले बटाटे पाहून घ्यावे लागतात. ज्या बटाट्यांना अधिक अंकुर फुटलेले असतील, ते लागवडीसाठी निवडावेत. बटाट्याचे तुकडे करूनही लागवड करू शकतो; परंतु आरंभी त्यांना अधिक पाणी दिले गेले, तर हे तुकडे कुजण्याची शक्यता असते; म्हणून अख्खा बटाटा लावणे कधीही श्रेयस्कर ठरते. पिशवीच्या किंवा कुंडीच्या आकारमानाप्रमाणे १ किंवा २ बटाटे घेऊन ते मातीमध्ये ठेवून न्यूनतम २ इंच आत जातील, एवढी माती त्यावर हलकेच पसरावी आणि पाणी द्यावे.
५. मातीची भर घालणे
मातीतून कोंब वर येत जातील, तसे त्याभोवती सेंद्रिय खतमिश्रित माती घालत जावे. त्यामुळे कोंब सरळ उभे रहातील. बटाट्याच्या रोपांचे खोड अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यांना आधार देण्याची आवश्यकता असते. माती अल्प झाल्याने बटाटे मातीच्या वरच्या भागात डोकावले, तर ते मातीने त्वरित झाकून घ्यावे; अन्यथा बटाट्याचा मातीच्या वर आलेला भाग हिरवा पडू शकतो. वेळोवेळी माती घालत राहिल्यावर कुंडी किंवा गोणी भरली की, नंतर केवळ अधूनमधून पाणी देणे एवढेच करत रहावे.
६. किडींचे व्यवस्थापन
बटाट्यांवर सहसा कीड पडत नाही; पण एक विशिष्ट प्रकारचा किडा (कोलोरॅडो पोटॅटो बीटल) कधीतरी त्रास देऊ शकतो. त्याची पिवळ्या रंगाची अंडी पानांच्या खाली असतात. ती कधी दिसली, तर त्वरित काढून नष्ट करावीत.
७. बटाट्यांची काढणी
३ – ४ मासांत रोपांची पाने पिवळी पडू लागतील. क्वचित् फुलेही येतील. रोपे मलूल पडून आडवी पडतील. अशा अवस्थेत आठवडा जाऊ दिल्यावर आपले बटाट्यांचे पीक काढण्यायोग्य झाले आहे, असे समजावे. त्या काळात बटाट्याला पाणी देऊ नये. बटाटे लावलेली कुंडी किंवा गोणी सावलीमध्ये मोकळ्या जागी नेऊन उलटी करावी. बटाटे मातीमधून हाताने बाहेर काढावेत. वाळलेली रोपे कंपोस्ट खत बनवण्यासाठी वापरावीत किंवा इतर कुंड्यांमध्ये आच्छादन म्हणून घालावीत. (‘झाडाच्या मुळाशी पालापाचोळा अंथरणे’, याला आच्छादन म्हणतात. – संकलक) कुंडीतील माती पुनर्वापराकरता घेण्याआधी आठवडाभर सावलीत पसरून ठेवावी.
८. बटाट्यांची पुनर्लागवड
पेरणी ते काढणी हा तीन ते साडेतीन मासांचा काळ आणि घरातील बटाट्यांची आवश्यकता या दोन्ही गोष्टी लक्षात घेता, प्रत्येक मासात बटाटे लावत राहिल्यास घरात नेहमीच घरच्या घरीच सेंद्रिय खतावरचे बटाटे उपलब्ध होत रहातील. आरंभी पेठेतून आणलेले बटाटे २ – ३ वेळा पेरणीसाठी वापरले, तरी नंतर मात्र घरचेच बटाटे पुनर्लागवडीसाठी वापरता येतील.
– श्री. राजन लोहगांवकर, टिटवाळा, जिल्हा ठाणे. (१४.६.२०२१)
(साभार : https://vaanaspatya.blogspot.com/)
बटाटा लागवडीचे प्रात्यक्षिक पहाण्यासाठी सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील पुढील मार्गिका उघडा.
मार्गिका : https://www.sanatan.org/mr/a/85417.html
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
लागवडीसंबंधी प्रायोगिक लिखाण पाठवा !
‘लागवड हा एक प्रायोगिक विषय आहे. यामध्ये लहान लहान अनुभवांनाही पुष्कळ महत्त्व असते. जे साधक आतापर्यंत लागवड करत आले आहेत, त्यांनी त्यांना लागवड करतांना आलेले अनुभव, झालेल्या चुका, त्या चुकांतून शिकायला मिळालेली सूत्रे, लागवडीसंबंधी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग यांविषयीचे लिखाण स्वतःच्या छायाचित्रासहित पाठवावे. हे लिखाण दैनिकातून प्रसिद्ध करता येईल. यातून इतरांनाही शिकता येईल.
लिखाण पाठवण्यासाठी टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
संगणकीय पत्ता : sankalak.goa@gmail.com