नोकरीच्या नावाखाली कुवैतमध्ये केरळमधील दोघा महिलांची विक्री

व्हिडिओद्वारे माहिती देऊन सुटका करण्याची मागणी

प्रातिनिधिक छायाचित्र

कुवैत सिटी (कुवैत) – केरळमधील २ महिला कुवैत येथे नोकरीच्या निमित्ताने गेल्यानंतर त्या मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकल्या. तेथे त्यांना घरकाम करण्यासाठी विकण्यात आल्याचे लक्षात आले. याविषयी त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी त्यांना कुवैतमध्ये अपहरणाला सामोरे जाण्याचा आणि छळ करण्यात आल्याचा अनुभव आल्याचे म्हटले आहे. त्यांनी या छळातून सुटका करण्याचीही मागणी केली आहे.

या महिलांना कोच्चि येथील एका भरती केंद्रातून कुवैतमध्ये ३ लाख ५० सहस्र रुपयांना विकण्यात आले होते. कुटुंबियांच्या निर्वाहासाठी या महिलांना विदेशात नोकरी करण्यास बाध्य व्हावे लागले होते; मात्र त्यांचा या असाहाय्यतेचा अपलाभ उठवत त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ पाठवून त्यांच्या होणार्‍या छळाची माहिती दिली आणि साहाय्याची मागणी केली. जर आम्ही आम्हाला ज्यांना विकण्यात आले आहे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या नाहीत, तर ते आम्हाला इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेला विकतील, अशी धमकी देण्यात आली आहे, असेही या महिलांनी या व्हिडिओत म्हटले होते.

संपादकीय भूमिका

भारतातून इस्लामी देशांमध्ये कामानिमित्त गेलेल्या नागरिकांचा छळ केला जातो, हे नवीन नाही. याविषयी आता भारत सरकारने कठोर पाऊले उचलून त्यांचे रक्षण केले पाहिजे !