शिवसेना आणि ठाकरे यांचे नाव न वापरता जगून दाखवा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आव्हान

डावीकडून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – ‘मला सत्तेचा लोभ नाही; मेलो तरी शिवसेना सोडणार नाही’, असे म्हणणारे आता पळून गेले आहेत. शिवसेना आणि ठाकरे यांचे नाव न वापरता जगून दाखवावे, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना केले आहे. मी लायक नसेल, तर पद सोडायला सिद्ध आहे; मात्र आमदार संजय राठोड यांच्यावर आरोप होऊनही मी त्यांना सांभाळले होते. तरीही ते बंडखोरांना जाऊन मिळाले. माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणे, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, असेही ते म्हणाले.

२३ जून या दिवशी मुंबई येथील शिवसेना भवनात राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि नगरसेवक यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ऑनलाईन’ उपस्थिती लावली. त्या वेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने सर्व काही दिले आहे. त्यांचा मुलगा खासदार आहे. त्यांना नगरविकासमंत्री पद दिले. माझ्याकडे असलेली २ खाती त्यांना दिली. आमच्याकडे सत्ता आल्यानंतर प्रथम कोरोना आला. त्यानंतर माझे आजारपण आले. कोण कसे वागले, यात आपल्याला जायचे नाही. मी जिद्द सोडलेली नाही. मला सत्तेचा लोभ नसून वर्षा सोडून मी मातोश्री येथे आलो आहे. मी बरा होऊ नये; म्हणून काही जण देव पाण्यात ठेवून बसलेले होते.