मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे द्वापर युगातील शस्त्रे सापडली !

सापडलेली शस्त्रे

मैनपुरी (उत्तरप्रदेश) – येथील गणेशपूर गावातील एका शेतामध्ये ४ सहस्र वर्षांपूर्वीचा शस्त्रसाठा सापडला आहे. तांब्यापासून बनवण्यात आलेल्या या शस्त्रांची लांबी ४ फूट आहे. यात तलवारी, ‘स्टार फिश’ मासाच्या आकाराप्रमाणे, तर काही भाल्याच्या टोकाप्रमाणे शस्त्रे आहेत. पुरातत्व विभागाने ही शस्त्रे कह्यात घेतली आहेत. ही शस्त्रे द्वापर युगातील असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.

१. गणेशपूर गावातील एक शेतकरी शेतात काम करत असतांना त्याला शेतभूमीत  शस्त्रांचा साठा सापडला. ‘ही शस्त्रे सोने किंवा चांदी यांपासून बनवण्यात आली असावीत’, असा समज झाल्याने त्याने ती घरी नेली; मात्र याची माहिती गावकर्‍यांना मिळताच त्यांनी पोलिसांना आणि पुरातत्व विभागाला याविषयी कळवले. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन ही शस्त्रे कह्यात घेतली.

२. याविषयी पुरातत्व विभागाचे अधिकारी भुवन विक्रम यांनी सांगितले की, हडप्पा काळामध्ये कांस्य धातूपासून शस्त्रे बनवली जात होती. त्यामुळे गणेशपूर गावात सापडलेल्या शस्त्रांंचा ताम्र पाषाण युगाशी (चाल्कोलिथिक) थेट संबंध असल्याचे दिसून येते.

३. पुरातत्व विभागाचे प्रवक्ते वसंत स्वर्णकार यांनी सांगितले की, ही शस्त्रे २ सहस्र ते १ सहस्र ५०० इसवीसन पूर्व काळात अस्तित्वात होती. या काळामध्ये मातीच्या भांड्यांना लाल रंगाने (गेरू) रंगवले जाई. बागपतमधील सनौली, मुराबादमधील मदारपूर आणि सहारनपूरमधील सकटपूर येथून घेण्यात आलेल्या नमुन्यांची ‘कार्बन डेटिंग’ चाचणी करण्यात आली. त्या वेळी ती ४ सहस्र वर्षांपूर्वीची असल्याचे सिद्ध झाले, तसेच ही शस्त्रे सुरक्षा रक्षकांकडील असून सामान्य लोकांकडील असू शकत नाही.