#Ayurved #आयुर्वेद : …रोगांचे मूळ आणि त्यावरील दैवीचिकित्सा
आयुर्वेद काय सांगतो ?
कुठलाही रोग हा शरिरातील वात, पित्त किंवा कफ यांच्या प्रमाणातील पालटामुळे होतो. आयुर्वेदानुसार कर्करोगापासून हृदयरोगापर्यंत आणि पक्षाघातापासून मधुमेहापर्यंत सर्व रोगांचे मूळ हेच आहे. शरिरातील त्रिदोषांपैकी कुठल्याही दोषाचे प्रमाण वाढले किंवा अल्प झाले किंवा त्यांच्या गुणांत पालट झाल्यामुळे ते दूषित झाले, तर हेच कण शरिरात रोग उत्पन्न करतात. ‘आहार (सात्त्विक अन्न) आणि विहार (व्यायाम आणि योग्य दिनचर्या) योग्य ठेवून, तसेच शरिरातील वात, पित्त अन् कफ यांच्या कणांचे प्रमाण समतोल किंवा साम्यावस्थेत ठेवून रोग टाळता येतात किंवा त्यांची तीव्रता अल्प ठेवता येते किंवा ते बरे करता येतात’, असे आयुर्वेद सांगतो.
‘रोग होऊ नयेत’ म्हणून आयुर्वेदाने सुचवलेले उपाय !
रोग झाल्यावर ते बरे करण्यापेक्षा ‘रोग होऊच नयेत’; म्हणून आयुर्वेदाने पाळावयास सांगितलेली बंधने रोगाचे कारणच अप्रत्यक्षपणे सांगतात !
१. प्रज्ञापराध (बुद्धी, स्थैर्य, स्मृती यांपासून दूर जाऊन, हानी ठाऊक असूनही शारीरिक, वाचिक किंवा मानसिक पातळीवर पुन्हा पुन्हा केलेले अयोग्य कृत्य) होऊ न देणे
२. मन आणि इंद्रिये कह्यात ठेवणे अन् काम, क्रोध इत्यादी आवेगांचे नियंत्रण करणे
३. खोकला, शौच, लघवी आदी नैसर्गिक वेग दाबून न धरणे
४. आरोग्यासाठी हितकर आहार-विहार करणे
५. वसंत ऋतूत कफ वाढू नये; म्हणून उलटी करणे, शरद ऋतूत पित्त वाढू नये; म्हणून रेचक घेणे, पावसाळ्यात वात वाढू नये; म्हणून ‘एनिमा’ घेणे
६. देश-कालाप्रमाणे दिनचर्या आणि ऋतूचर्या आखणे
७. दान करणे आणि दुसऱ्यास साहाय्य करणे
८. सत्य बोलणे, तसेच तप आणि योग साधना करणे
९. अध्यात्माचे चिंतन करणे आणि त्याप्रमाणे वागणे
१०. सद्वर्तन करणे, सर्वांशी स्नेहभावाने आणि समतेने वागणे
आरोग्य उत्तम राखण्याचे महत्त्व !
आयुर्वेदाला पाचवा वेदच मानले जाते. ‘चरकसंहिता’ हा आयुर्वेदातील एक मूलभूत ग्रंथ आहे. या ग्रंथात आरोग्य उत्तम राखण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगितले आहे.
धर्मार्थकाममोक्षाणाम् आरोग्यं मूलमुत्तमम् ।
– चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय १, श्लोक १५
अर्थ : धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ साध्य करण्यासाठी ‘उत्तम आरोग्य असणे’ हा पाया आहे.
रोगाच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्या निवारणाचा उपाय शोधण्यास शिकवणारा आयुर्वेद !
‘माझी प्रकृती का बरी नाही ?’ या तुमच्या प्रश्नाला आधुनिक वैद्यांकडून काय काय उत्तरे मिळतात ? ‘तुमचे रक्त अल्प आहे, तुमच्यात ‘कॅल्शियम’ न्यून आहे, तुमच्या मणक्यात ‘गॅप’ आहे, तुमच्या शरिरातील क्षार घटले आहेत, तुमचे ‘थायरॉईड’ वाढले आहे, तुमच्या हाडांची झीज झाली आहे किंवा तुमच्या रक्तामध्ये साखर अधिक आहे’ इत्यादी. त्यावर समादेश (सल्ला) मिळतो, ‘‘यासाठी तुम्हाला औषध घ्यावे लागेल.’’ काही वेळा तर असाही समादेश मिळतो की, ही औषधे आयुष्यभर घ्यावीच लागतील. याचा शेवट ‘आता हा अवयव पालटावा लागेल किंवा काढावा लागेल. याला पर्याय नाही’ इत्यादी उत्तरांत होतो.
सर्वसाधारणपणे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जेवण चौरस असतेच. एवढे खाऊनसुद्धा सुशिक्षित वर्गातही एखाद्या विशिष्ट घटकाची न्यूनता (डेफिशिएन्सी) किंवा वाढ का निर्माण होते ? त्यामुळे ‘आयुष्यभर औषधे घ्या’, हे अंतिम उत्तर नव्हे ! ‘रक्त अल्प आहे; म्हणून रक्त वाढवणारी औषधे घ्या आणि साखर वाढली आहे; म्हणून साखर घटवणारी इन्सुलिनसारखी कृत्रिम औषधे आयुष्यभर घेत रहा’, हे काही उत्तर नव्हे. त्यासाठी मूळापासून रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाची कास धरणे श्रेयस्कर ठरते !
– वैद्य सुविनय दामले, कुडाळ
देहातील ‘अग्नी’च आरोग्याचे मूळ !
१. आरोग्यप्राप्तीसाठी देहातील अग्नीचे (पचनशक्तीचे) महत्त्व !
१ अ. देहातील अग्नि हे भगवंताचे रूप असणे : बाह्य सृष्टीत जसे अग्नीमुळे अन्न शिजते, तसेच खाल्लेल्या आहाराचे अग्नीमुळे पचन होते. देहातील अग्नीला ‘वैश्वानर’ असे नाव आहे. यालाच ‘जाठराग्नि’ असेही म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतो,
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १५, श्लोक १४
अर्थ : हे अर्जुना, मी ‘वैश्वानर’ अग्नि बनून प्राणीमात्रांच्या देहांत निवास करतो. प्राण आणि अपान यांनी युक्त होऊन मी (वैश्वानर अग्नि) ४ प्रकारच्या अन्नाचे पचन करतो. (चावून खाण्याजोगे, चाटून खाण्याजोगे, गिळण्याजोगे आणि पिण्याजोगे असे अन्नाचे ४ प्रकार सांगितले आहेत.)
२. जाठरो भगवान् अग्निः ईश्वरोऽन्नस्य पाचकः । – सुश्रुतसंहिता, सूत्रस्थान, अध्याय ३५, श्लोक २७
अर्थ : जाठराग्नि हा प्रत्यक्ष भगवंताचे रूप असून तो ईश्वरच देहातील अन्नाचे पचन करत असतो. शरिरात अग्निरूपाने भगवंतच वास करत असल्यामुळे भोजन हे केवळ ‘उदरभरण’ नसून ते ‘यज्ञकर्म’ आहे.
३. आयुष्य आणि आरोग्य देहातील अग्नीवरच अवलंबून असणे !
आयुर्वर्णो बलं स्वास्थ्यम् उत्साहोपचयौ प्रभा ।
ओजस्तेजोऽग्नयः प्राणाश्चोक्ता देहाग्निहेतुकाः ।।
शान्तेऽग्नौ म्रियते युक्ते चिरं जीवत्यनामयः ।
रोगी स्याद् विकृते मूलम् अग्निस्तस्मात् निरुच्यते ।।
– चरकसंहिता, चिकित्सास्थान, अध्याय १५, श्लोक ३ आणि ४
अर्थ : आयुष्य; शरिराचा वर्ण; बळ; आरोग्य; उत्साह; उपचय (पुष्टी); कांती; ओज; तेज; शरिरातील पंचमहाभूतांचे ५ भूताग्नी; रस, रक्त आदी ७ धातूंमधील (शरीर घटकांतील) ७ धात्वग्नी आणि प्राण हे देहातील अग्नीवर (पचनशक्तीवर) अवलंबून आहेत. देहातील अग्नि शांत होताक्षणी मरण येते. अग्नि जर नीट राखला, तर दीर्घ आयुष्य अन् आरोग्य लाभते. अग्नि विकृत झाला किंवा बिघडला, तर विकार उत्पन्न होतात. यामुळे ‘अग्नि हा देहाचे मूळ आहे’, असे ऋषी म्हणतात.
४. देहातील अग्नीचे रक्षण होऊन आरोग्य मिळण्यासाठी करण्याच्या ४ मूलभूत कृती
अ. लवकर झोपा, लवकर उठा आणि दुपारी झोपणे टाळा !
आ. मल-मूत्रादिकांचे वेग (प्रवृत्ती) रोखू नका !
इ. शरिरातील रोगकारक त्रिदोष नष्ट करण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करा !
ई. आहाराचे ४ मूलभूत नियम पाळा ! हे नियम असे आहेत. –
१. योग्य वेळी जेवा !
२. योग्य प्रमाणात जेवा !
३. आवश्यक तेवढेच पाणी प्या !
४. अनारोग्य असतांना दूध आणि दुधाचे पदार्थ टाळा ! ॐ
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !)
रोगाची आध्यात्मिक कारणे आणि दैवीचिकित्सा !
औषधांसमवेत आयुर्वेद ‘दैवी चिकित्सा’ही सांगतो. बहुतांश वेळा कुठल्याही शारीरिक रोगामध्ये काही प्रमाणात आध्यात्मिक आणि काही प्रमाणात मानसिक भाग असतो. आयुर्वेद रोगाचे मूळ कारण शोधतांना आध्यात्मिक भागाकडेही लक्ष वेधतो. ‘औषधाचा तितकासा परिणाम न होणारे काही रोग हे मागील जन्मांतील चुकांमुळे, म्हणजे प्रारब्धामुळे होतात’, असे आयुर्वेदात सांगितले आहे. आयुर्वेदाने १४ प्रकारची दैवीचिकित्सा सांगितली आहे. मंत्र; औषधे; मणी (ग्रहांचे खडे); होम आणि यज्ञ; प्रायश्चित्त आणि व्रते; उपवास; दान; जप; तप; द्विज (ब्राह्मण), देवता किंवा गुरु यांची पूजा; द्विज आणि संत यांचा सन्मान, सत्संग; सर्व प्राणीमात्रांविषयी मैत्रीभावना; योगाभ्यास आणि ध्यानधारणा; तसेच कुलाचार आदी गोष्टी या अंतर्गत येतात.
‘मंत्रोपाय, नामजप करणे, स्तोत्र म्हणणे, दृष्ट काढणे, देहावरील काळ्या शक्तीचे आवरण काढणे आदी आध्यात्मिक उपायांनी काही रोग बरे होतात किंवा त्याची तीव्रता न्यून होते किंवा संबंधित औषधे रोगांवर लागू होतात’, हे सनातनच्या सहस्रो साधकांनी अनुभवले.
मंत्रोपाय
परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांनी अनेक रोगांवर मंत्रोपाय दिल्याने सनातनच्या अनेक साधकांचे रोग दूर झाले किंवा न्यून झाले. अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी ते मंत्र शोधून काढले आहेत.
पूर्वजांच्या त्रासांमुळे होणाऱ्या रोगांवरील उपाय !
सध्या समाजातील बहुतांश व्यक्तींना पूर्वजांचे त्रास असतात. काही रोग हे पूर्वजांच्या त्रासांमुळे होतात. ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप केल्याने पूर्वजांचे त्रास न्यून झाल्याने ते रोग बरे होतात. ‘ssrf.org’ या संकेतस्थळावर याची उदाहरणे दिली आहेत.
प्राणवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या रोगांवर उपाय
श्वसन, पचन, मज्जा आदी संस्था, तसेच रक्ताभिसरण यांना प्राणवहन (चेतना) संस्था प्राणशक्ती पुरवते. त्यात अडथळा निर्माण झाल्याने संबंधित इंद्रियाची कार्यक्षमता अल्प होऊन विकार निर्माण होतात. काही वेळा वैद्यकीय पडताळणीच्या चाचण्या सामान्य येतात; परंतु त्रास होत असतो. तेव्हा संबंधित संस्थेतील किंवा अवयवातील प्राणशक्ती (चेतना) न्यून झाल्यामुळे तो विकार झालेला असतो. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी हिंदु धर्मातील ज्ञानाचा उपयोग करून प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे शोधण्याची पद्धत, तसेच विविध मुद्रा, न्यास आणि नामजप यांच्या संदर्भात स्वतः प्रयोग केले आणि विकार बरे होण्यासाठी सनातनच्या साधकांना ही उपायपद्धत सांगितली. या उपायपद्धतील हाताच्या बोटांच्या मुद्रा आणि नामजप करून विशिष्ट कुंडलिनीचक्राच्या ठिकाणी किंवा अवयवांच्या ठिकाणी न्यास करायचा असतो. वर्ष २०१० पासून सनातनच्या सहस्रो साधकांना याचा लाभ होत असल्याने हे एक प्रमाणभूत शास्त्रच झाले आहे.
देवतांचा एक आड एक नामजप, रिकाम्या खोक्यांचे उपाय आदी वैशिष्ट्यपूर्ण उपायद्धतीही प.पू. डॉक्टरांनी शोधून काढल्या आहेत.
विकारांसाठी देवतांचे नामजप
मनुष्याचा देह पंचमहाभूतांनी बनल्याने एखाद्या तत्त्वाचे असंतुलन झाल्यास विकार निर्माण होतात. विकारही पंचतत्त्वांशी संबंधित असतात. प्रत्येक देवतेमध्येही पंचतत्त्वे असतात. देवतेमध्ये असलेल्या पंचतत्त्वांपैकी एखाद्या तत्त्वाच्या आधिक्यानुसार ती देवता त्या तत्त्वाशी संबंधित विकार लवकर बरे करू शकते. पंचतत्त्वांशी संबंधित विकाराच्या नामजपासह मुद्रा आणि न्यास केल्यास उपायांचा अधिक लाभ होतो. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विकार निर्मूलनासाठीच्या नामजपाचे संशोधन केले आहे.
सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनीही विविध रोगांवरील विशिष्ट नामजप शोधून काढले आहेत.
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
#Ayurved #आयुर्वेद #Ayurveda