शिवसेनेकडून कितीही नोटिसा आल्या, तरी घाबरणार नाही ! – एकनाथ शिंदे

शिवसेनेकडून मला कितीही नोटिसा आल्या, तरी आम्ही घाबरत नाही – एकनाथ शिंदे

मुंबई/गौहत्ती – ‘माझ्याकडे ५० हून अधिक, म्हणजे दोन तृतीयांशापेक्षा अधिकचे आमदार असून पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे. सगळे निर्णय बैठकीनंतर घेतले जातील. शिवसेनेकडून मला कितीही नोटिसा आल्या, तरी आम्ही घाबरत नाही. अशा प्रकारच्या चुकीच्या नोटिसा पाठवून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची महाशक्ती आमच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केले.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ३७ आमदारांचे पत्र राज्यपालांना सादर !

एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून निवड केल्याचे पत्र ३७ आमदारांनी विधानसभेचे उपसभापती नरहरि झिरवाळ यांना दिले. या पत्राची प्रत राज्यपाल कोश्यारी आणि विधान परिषदेचे सचिव राजेंद्र भागवत यांनाही पाठवण्यात आली आहे.

२३ जूनच्या रात्री आणखी काही आमदारही गौहत्ती येथे पोचले आहेत. शिवसेनेचे चांदिवली येथील आमदार दिलीप लांडे, आमदार दादा भुसे, संजय राठोड. रवींद्र फाटक, तसेच अपक्ष आमदार किशोर जोडगेवार, आमदार सौ. गीता जैन आदींचा त्यात समावेश आहे. शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ३९ आमदार आणि १४ अपक्ष आमदार, असे एकूण ५३ आमदार आहेत. आमदारांची संख्या आणखी वाढू शकते.

आमदारांचे सदस्यत्व रहित करा ! – शिवसेना

नोटीस देऊनही पक्षाच्या विधीमंडळ बैठकीला उपस्थित न राहिल्याने आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांचे सदस्यत्व रहित करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवाळ यांच्याकडे केली आहे.

याउलट एकनाथ शिंदे गटाने ‘शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेली मागणी अनधिकृत आहे’, असे म्हटले आहे.

बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठीण होईल ! – नारायण राणे

शरद पवार गौहत्ती येथे गेलेल्या सर्व आमदारांना धमक्या देत आहेत. हे सर्व आमदार विधीमंडळात येऊन त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठीण होईल.

(सौजन्य : TV9 Marathi)  

काही जणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

सुरक्षा रक्षकांनी एकनाथ शिंदे यांच्या पलायनाची पोलीस मुख्यालयाला दिली होती माहिती !

एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन सूरतच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती, तसेच ४ मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनीही याविषयी माहिती दिली होती. यावर गृहविभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे समोर आले आहे. तथापि बंडखोर नेत्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांवर कारवाई होणार नाही. आमदारांच्या बंडाविषयीची माहिती पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला कशी मिळाली नाही ?, असा प्रश्‍न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आता संशयाची सुई दिलीप वळसे-पाटील यांच्या गृहविभागाकडे वळली आहे.

दिवसभरातील ठळक घडामोडी

१. मुंबई येथील पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. शिवसेना भवनाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
२. महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भीतीने मंत्र्यांची घालमेल वाढली असून धारिकांचे काम पूर्ण करण्यासाठी मंत्रालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील मंत्र्यांची लगबग वाढली आहे.
३. शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने शिवसैनिकांनी क्षीरसागर यांच्या घरावर मोर्चा काढला.
४. ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे ६० नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले.
५. ‘सत्तासंघर्षासाठी अमर्याद व्यय होणारा पैसा ‘ईडी’ला दिसत नाही का ?’, असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.
६. ‘राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या २ दिवसांपासून अंधाधुंदपणे अध्यादेश काढून निर्णय घेतले जात आहेत. त्यात तातडीने हस्तक्षेप करावा, असे पत्र मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवले आहे’, अशी माहिती भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करून दिली.

७. सांगली जिल्ह्यातील ईश्‍वरपूर येथे शिवसैनिकांनी फेरी काढून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. त्याचसमवेत शिवसेनेचे नेते आनंद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.
८. संकटकाळात पक्षाने कधीही विचारपूस केली नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या बंडखोर आमदार यामिनी जाधव यांनी व्यक्त केली.
९. राज्य विधीमंडळाने शिवसेनेचे अजय चौधरी यांची गटनेते पदी अधिकृत नियुक्ती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली.
१०. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर येथे शिवसैनिकांनी फेरी काढली.
११. ‘आम्हीच शिवसेना आहे’, असे म्हणणार्‍या एकनाथ शिंदे गटासमोर मोठा कायदेशीर पेच आहे. एक तर त्यांना मूळ पक्ष असलेल्या शिवसेनेत विलीन व्हावे लागेल किंवा खांद्यावरील भगवा उतरवून भाजप किंवा प्रहार पक्षात सहभागी व्हावे लागेल. त्यानंतरच त्यांचे सदस्यत्व कायम राहील, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी २३ जूनला पत्रकारांशी बोलतांना केले.