शारदापीठ भारताने कह्यात घ्यावे !
इस्लामी आक्रमकांनी कह्यात घेतलेली भारतातील मंदिरे मुक्त करण्याचा विषय सध्या भाजप आणि देशभरातील हिंदूंनी जोरकसपणे लावून धरला आहे. यातच आता भर म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या सिद्धतेसाठी झालेल्या शिबिरात ‘शारदापीठ स्मृतीचिन्ह’, प्रत्येक नेत्याला दिले, तसेच ‘शारदापीठ पाकिस्तानच्या कह्यातून मुक्त करावे’, अशी मागणीही केली. पाकिस्तानात असलेले हे शक्तीपीठ अत्यंत प्राचीन असून काश्मिरी हिंदूंची यावर विशेष श्रद्धा आहे. काश्मीरमधील कुपवाडपासून हे स्थान केवळ १० किलोमीटर अंतरावर आहे. वर्ष १९४७ च्या पूर्वी इथे हिंदू नियमितपणे दर्शनासाठी जात. पाकिस्तानात गेल्यानंतर या पिठाची अत्यंत वाईट अवस्था असून तेथे खांबांचे काही अवशेषच शिल्लक राहिले आहेत.
मंदिर भारत-पाक सीमेवर असल्याने सहजरित्या येथे जाता येत नाही, तर मंदिराजवळ जाण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे लागते. या मंदिरात जाता यावे, तेथे पूजा-अर्चा करता यावी, यासाठी हिंदूंनी घेतलेली भूमिका अभिनंदनीय आहे. भारतात मुसलमान आक्रमकांनी मंदिरे उद्ध्वस्त करून त्या जागी मशिदी बांधल्या. ही धार्मिक स्थळे परत मिळण्यासाठी भारतातील हिंदू पुढे येत आहेत. त्याही पुढे जाऊन आता पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंची मंदिरे परत मिळावीत, अशी मागणी हिंदू करत आहेत. त्याची नोंद आता सरकारने घ्यायलाच हवी. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील मंदिर कह्यात घेण्याचे धाडसी पाऊल सरकार उचलेल का ? पाकच्या कुरापती काही थांबणार नाहीत. त्यामुळे ‘शारदापीठाचा जीर्णाेद्धार करा’, अशी मागणी केल्यास पाक त्याला भीक घालणार नाही. हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची ही चिन्हे कशी पुसली जातील, यासाठीच पाक प्रयत्न करेल. हे लक्षात घेऊन आता भारतानेच शारदापीठाच्या जीर्णाेद्धारासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आक्रमक पावले उचलून हा भागच कह्यात घेणे आवश्यक आहे.