काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविषयी तक्रार करूनही मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष ! – शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर
गौहत्ती (आसाम) – केवळ मीच नाही, तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आमदारांना लगाम घालण्याविषयी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते; पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, अशी तक्रार शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी केली.
केसरकर पुढे म्हणाले, ‘‘आमचे आणि भाजपचे नाते पुष्कळ जुने आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी संबंध तोडून भाजपशी हातमिळवणी करावी, अशी मागणी आम्ही केली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही मागणी अमान्य केल्यास वेगळा मार्ग काढण्यात येईल. गुजरातमध्ये पोचल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दूरभाषद्वारे सांगितले की, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही अजूनही आमचे ऐकाल, तर आम्ही परत येऊ. ज्या पक्षाशी आपली हिंदुत्वाची विचारधारा जुळते, त्या पक्षाशी आपण हातमिळवणी करायला हवी. आपण हिंदुत्वनिष्ठ आहोत. त्यालाच चिकटून राहिले पाहिजे. तथापि उद्धव ठाकरे यांनी ‘कोणत्याही किमतीत भाजपशी हातमिळवणी करणार नाही’, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.’’