शिवसेनेचे आमदार असूनही आमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाची दारे बंद होती !
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
गौहत्ती (आसाम) – गेली अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याची दारे शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही प्रवेश मिळाला नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना
२२ जून या दिवशी पत्र पाठवून मनातील खदखद व्यक्त केली. हे पत्र त्यांनी ट्विटरवर प्रसारित केले आहे.
या पत्रात म्हटले आहे,
१. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या आणि विधानपरिषद आणि राज्यसभा येथे आमच्या जिवावर जाणाऱ्या लोकांची मनधरणी करावी लागत होती. हेच लोक आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकींची रणनीती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.
२. मतदारसंघातील कामांसाठी आणि इतर प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक भेटायचे आहे, अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर ‘वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलावले आहे’, असा निरोप यायचा; मात्र आम्हाला बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर ताटकळत ठेवले जायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जात होतो. स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का ? हा आमचा प्रश्न आहे. असेच सर्व हाल आम्ही सर्व आमदारांनी सहन केले.
३. आम्हाला वर्षा बंगल्यावर प्रवेश मिळत नव्हता, तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदारसंघाची कामे करत होते. ते निधी मिळाल्याचे पत्र नाचवत होते. भूमीपूजन आणि उद्घाटन करत होते. तुमच्यासमवेत काढलेली छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करत होते. त्या वेळी आमच्या मतदारसंघातील लोक विचारायचे की, मुख्यमंत्री आपला असतांनाही आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो ? त्यांची कामे कशी होतात ? तुम्ही आम्हाला भेटत नव्हता, तर आम्ही मतदारांना काय उत्तर द्यायचे ? या विचाराने जीव कासावीस व्हायचा.
४. आमची व्यथा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी ऐकून घेण्याची तसदीही घेतली नाही. किंबहुना तुमच्यापर्यंत ती पोचवलीही जात नव्हती; मात्र याच वेळी आम्हाला एकनाथ शिंदे यांचा दरवाजा उघडा होता. तेच आमचे ऐकून घेऊन सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांना हा निर्णय घेण्यास सांगितले. आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी हे भावनिक पत्र लिहावे लागत आहे.