भात आणि नाचणी यांच्या लागवडीची ठळक वैशिष्ट्ये !
मोसमी पावसाला प्रारंभ झाला आहे. या काळात भात आणि नाचणी यांची लागवड केली जाते. ती लागवड कशा प्रकारे करावी ? बियाणाची निवड आणि बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, तसेच चार सूत्री भात लागवडीची ठळक वैशिष्ट्ये इत्यादींची माहिती येथे देत आहोत.
१. भात
१ अ. भूमी आणि हवामान : समुद्रसपाटीपासून ३ ते ५ सहस्र फूट उंचीवर असलेल्या भागात भाताची लागवड केली जाते. उष्ण आणि दमट हवामान या पिकास पोषक आहे. साधारणतः भूमीचा सामू (पी.एच्.) ५ ते ८ या दरम्यान असावा. पर्जन्यमान (पाऊस) ८०० मिलीमीटरहून अधिक असणाऱ्या भागात, तसेच २५ ते ३५ डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि ६५ ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त आद्रता पोषक असते. हलक्या आणि मध्यम भूमीसह हे पीक खार भूमीतही घेतले जाते.
१ आ. पूर्वमशागत : भात पिकाच्या योग्य वाढीसाठी शेताची योग्य प्रकारे पूर्वमशागत आणि चिखलणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. पूर्वमशागत आणि चिखलणी यांमुळे भूमीच्या विविध थरांची उलथापालथ होते अन् तण, कीड आणि रोग यांचेही नियंत्रण होते. भूमीची उभी आडवी नांगरट करून चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी १० टन या प्रमाणात भूमीत मिसळावे.
१ इ. लागवड पद्धती : भूमी, पाऊस आणि पाणी यांच्या उपलब्धतेनुसार भात लागवडीसाठी विविध पद्धतीचा अवलंब केला जातो.
१ इ १. लावणी पद्धत : ज्या ठिकाणी १००० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, अशा ठिकाणी या पद्धतीचा वापर केला जातो.
१ इ २. पेरणी पद्धत : ज्या ठिकाणी मध्यम ते भारी भूमी दिसून येतात, त्या ठिकाणी पाभर किंवा पेरणी यंत्राच्या साहाय्याने पेरणी केली जाते.
१ इ ३. टोकन पद्धत : १००० मिलीमीटरपेक्षा अल्प पावसाचा प्रदेश आणि मध्यम भूमी असलेल्या भागात टोकन पद्धतीने लागवड केली जाते.
१ ई. बियाणाची निवड आणि बीज प्रक्रिया : विद्यापिठाने शिफारस केलेल्या वाणांचे (जातींचे) बियाणे शासकीय यंत्रणेकडून, कृषी विद्यापिठाच्या विक्री केंद्राकडून किंवा खात्रीलायक विक्रेत्याकडून खरेदी करावे. लावणी पद्धतीसाठी ३५ ते ४० किलो बियाणे प्रती हेक्टरी, पेरणी पद्धतीसाठी ८० ते १०० किलो आणि टोकण पद्धतीसाठी ५० ते ६० किलो बियाणे वापरावे. संकरित जातीसाठी हेक्टरी २० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाणे ३० टक्के मिठाच्या द्रावणात (३०० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) बुडवून वरती तरंगणारे हलके आणि रोगट बियाणे काढून टाकावे अन् बियाणे सावलीत वाळवून घ्यावे. पेरणीपूर्वी प्रतिग्रॅम बियाण्यास २.५ ग्रॅम ‘थायरम’ चोळावे.
(भात आणि नाचणी यांच्या जाती २८ मे २०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध केल्या आहेत.)
निळे-हिरवे शेवाळ (२० किलो प्रति हेक्टर) भात लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी शेतात टाकावे, तसेच ‘ॲझोला’ (४ ते ५ क्विंटल प्रति हेक्टर) लागणीनंतर शेतात टाकावे.
१ उ. रोप लागण : रोपांच्या पुनर्लागणीपूर्वी पारंपरिक पद्धतीने किंवा यंत्राच्या साहाय्याने चिखलणी करावी. हळव्या (लवकर पक्व होणाऱ्या) जातींच्या रोपाची लागण पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी, निमगरव्या जातींची २३ ते २७ दिवसांनी आणि गरव्या जातींची २५ ते ३० दिवसांनी करावी. एका चुडात ३ ते ४ रोपे ठेवावीत. संकरित जातींसाठी एका चुडात १ ते २ रोपेच ठेवावीत. हळव्या जातींमध्ये रोपांची लागण १५ x १५ सें.मी., तर निमगरव्या आणि गरव्या जातीमध्ये २० x १५ सें.मी. अंतरावर करावी.
१ ऊ. खत व्यवस्थापन : चांगले कुजलेले शेण खत किंवा कंपोस्ट खत प्रति हेक्टरी १० टन याप्रमाणात पेरणीपूर्वी भूमीत चांगले मिसळावे. (गोमय उपलब्ध असल्यास त्याचासुद्धा उपयोग करू शकतो.) भात लागवडीसाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे. ही खत मात्रा हळव्या जातींमध्ये लागणीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश अन् ५० टक्के नत्र लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावी, तर निमगरव्या आणि गरव्या जातींमध्ये लागणींच्या वेळी ४० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश, ४० टक्के नत्र लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि २० टक्के नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावी. संकरित जातींसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे. ही खत मात्रा लागणीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश, २५ टक्के नत्र लागणीनंतर
२५ ते ३० दिवसांनी आणि उर्वरित २५ टक्के नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावी.
१ ए. चार सूत्री भात लागवडीची ठळक वैशिष्ट्ये !
१. भात पिकाच्या अवशेषाचा (भाताच्या तुसाची राख ०.५ ते १ किलो प्रति चौरस मीटर रोपवाटिकेमध्ये मिसळावे. त्यामुळे रोपांना सिलिकॉन या उपयुक्त अन्नद्रव्याचा पुरवठा होतो आणि रोपे निरोगी, कणखर अन् हिरवीगार होतात.) फेरवापर करावा.
२. भाताचा पेंढा (सुमारे २० किलो ग्रॅम प्रतिआर् (गुंठा)) नांगराच्या साहाय्याने भूमीत गाडावा. त्यामुळे भात पिकास सिलिकॉन आणि पालाश यांचा पुरवठा होतो. पिकाचे अंगी रोग आणि कीड यांना प्रतिकार करण्याची क्षमता येते.
३. गिरीपुष्पाचा पाला ३ टन प्रति हेक्टर चिखलणीच्या वेळी भूमीत गाडावा.
४. भाताच्या सुधारित जातींच्या रोपांची नियंत्रित लागण जोड ओळ पद्धतीने (लागणीचे अंतर १५-२५ x १५ सें.मी.) करावी.
५. यूरिया – डीएपी ६०:४० प्रमाणात ब्रिकेट्सचा (खताच्या गोळ्या) वापर (१७० किलो प्रति हेक्टर) करावा.
१ ऐ. जैविक आणि हिरवळीची खते यांचा वापर !
१. निळे-हिरवे शेवाळ (२० किलो प्रति हेक्टर) भात लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी शेतात टाकावे.
२. लागणीनंतर ‘ॲझोला’ (४ ते ५ क्विंटल प्रति हेक्टर) १० दिवसांनी शेतात टाकावे.
३. हिरवळीचे खत जसे गिरिपुष्प, धैंच्या, ताग इत्यादी ३ ते ५ टन प्रति हेक्टर चिखलात घालावे. याकरता गिरिपुष्पाची लागण शेताच्या बांधावर करून त्याच्या कोवळ्या फांद्या आणि पाला चिखलात गाडावा. ताग आणि धैंच्या अनुक्रमे ३० अन् ४० किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात पेरून फुलोऱ्यात आल्यावर भूमीत गाडावा.
नियंत्रित लागणीनंतर त्याच दिवशी किंवा ५ दिवसांपर्यंत प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात २.७ ग्रॅम वजनाची एक ब्रिकेट (यूरिया डिएपी) हाताने ५ सें.मी. खोल चिखलात खोचावी. यामुळे वापरलेल्या खताचा ८० टक्क्यांपर्यंत उपयोग होतो. वातावरणातील प्रदूषण टळते आणि पिकाचे उत्पादन वाढते.
१ ओ. आंतरमशागत : भाताच्या पुनर्लागणीनंतर आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा मजुरांकरवी तण काढून घ्यावे. पेरणी आणि टोकण पद्धतीने लागण केल्यास आवश्यकतेनुसार कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. लावणीनंतर भात खाचरामध्ये ५ ते ६ सें.मी. पाणी ठेवल्यास तणांचा प्रादुर्भाव अल्प दिसून येतो. तणाच्या बंदोबस्तासाठी ‘ब्युटाक्लोर ५० ईसी’ किंवा ‘बेंथिओकार्ब ५० ईसी’ हे तणनाशक २ ते ३ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात या प्रमाणात (१ हेक्टरसाठी ५०० ते ६०० लिटर द्रावण लागते.) मिसळून भात लागणीनंतर १ आठवड्याच्या आत
फवारणी करावी. तणनाशक फवारणीपूर्वी भात खाचरातील संपूर्ण पाणी काढून टाकावे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी शेतात भरावे.
१ औ. पाणी व्यवस्थापन : भात पिकाच्या योग्य वाढीकरता आणि अधिक उत्पादनाकरता भात खाचरात पाण्याची योग्य पातळी राखणे आवश्यक आहे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी पुढीलप्रमाणे असावी.
१. रोप लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत १ ते २ सें.मी.
२. रोपांच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत २ ते ३ सें.मी.
३. अधिक फुटव्याच्या अवस्थेत ३ ते ५ सें.मी.
४. भात पोटरीच्या अवस्थेत ५ ते १० सें.मी.
५. फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत १० सें.मी.
६. कापणीपूर्वी १० दिवस अगोदर पाण्याचा निचरा करावा.
१ अं. पीक संरक्षण : खोड किडीच्या नियंत्रणासाठी भात पिकाची काढणी वैभव विळ्याने जमिनीलगत करावी. भात पिकाच्या कापणीनंतर नांगरट करून काडी-कचरा, धसकटे गोळा करून नाश करावे. खोड किडा, तसेच इतर किडीच्या बंदोबस्तासाठी ‘क्लोरोपायरिफॉस’ २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा फवारणी करावी. भातावरील करपा आणि कडाकरपा रोगाच्या नियंत्रणासाठी ‘कॉपर ऑक्झिक्लोराईड’ ५० टक्के (२.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून) आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा फवारणी करावी किंवा ‘काबेंडँझिम’ ५० टक्के (२ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून) आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा फवारणी करावी.
१ क. कापणी, मळणी आणि साठवण : भाताच्या लोंब्यामधील ८० ते ९० टक्के दाणे पक्व झाल्याचे दिसताच पिकाची कापणी जमिनीलगत वैभव विळ्याने करावी. यंत्राच्या साहाय्याने कापणी केल्यास वेळेत आणि खर्चातही बचत होऊ शकते. कापलेला भात वाळण्यासाठी १-२ दिवस पसरून ठेवावा आणि नंतर मळणी करावी. चांगला उतारा मिळण्यासाठी मळणीयंत्र वापरावे. दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ ते १४ टक्के होईपर्यंत भात वाळवावा. नंतर जाड प्लास्टिक पिशवीमध्ये भरून कोरड्या, स्वच्छ आणि सुरक्षित जागी धान्याची साठवण करावी.
२. नाचणीची लागवड
२ अ. हवामान आणि भूमी : मध्यम ते जास्त पावसाच्या आणि उष्ण अन् दमट हवामानाच्या प्रदेशात डोंगर उतारावरील पाण्याचा निचरा होणाऱ्या वरखस भूमीमध्ये हे पीक घेतले जाते.
२ आ. पूर्वमशागत : पहिल्या पावसानंतर हलक्या लोखंडी किंवा स्थानिक नांगराने उतारास आडवी नांगरट करावी आणि दसकटे वेचून भूमी स्वच्छ करावी.
२ इ. लावणी : रोपे लावणीस सिद्ध झाल्यानंतर लावणीच्या १-२ दिवस अगोदर रोपवाटिकेस पाणी द्यावे. मोसमी पावसास प्रारंभ झाल्यानंतर रोपांची लागण करावी. २ ओळीत २० सें.मी. आणि २ रोपात १५ सें.मी. अंतर ठेवून एका ठिकाणी २ रोपे लावावीत. नाचणीच्या अधिक उत्पन्नासाठी सपाट आणि चांगला निचरा होणाऱ्या भूमीसाठी २५x१० सें.मी. अंतरावर पुनर्लागण करावी.
२ ई. रोप लागणीपूर्वी प्रति हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत भूमीत चांगले मिसळावे. तसेच ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. पहिला हप्ता ४० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद अन् पालाश लावणीच्या वेळेस द्यावा. नत्र खताचा दुसरा हप्ता (४० किलो नत्र) लावणीनंतर एक मासाने द्यावा.
२ उ. आंतरमशागत : लावणीनंतर आठवड्याभरात नांगे भरावे (ज्या ठिकाणी रोपे मृत झालेली आहेत, त्या ठिकाणी पुन्हा पुर्नलागण करावी.) लावणीनंतर २ ते ३ आठवड्याने खुरपणी करून शेत तणविरहीत ठेवावे.
२ ऊ. काढणी : पीक सिद्ध झाल्यानंतर नाचणीची कणसे विळ्याने कापून उन्हात वाळवावीत. नंतर काठीने बडवून किंवा यंत्राच्या साहाय्याने मळणी करावी. या पिकापासून हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पन्न मिळते.
संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), एम्.एस्सी. (ॲग्रिकल्चर), पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.६.२०२२)