मुंबईत ८ दिवसांत पाणीकपातीचा निर्णय !
मुंबई – धरणातील पाणीसाठा अल्प होत आहे. त्यातच धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडत नाही. त्यामुळे येत्या ८ दिवसांत पाणीकपात करण्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या ७ धरणांतील पाणीसाठा वेगाने आटत आहे. सातही धरणांत मिळून केवळ ९.७६ टक्के पाणीसाठा शेष आहे. गेल्या २ वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अल्प आहे. पुढील काही दिवसांत पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाऊस पडला, तरी प्रत्यक्ष पाणीसाठा वाढण्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत ९ टक्के पाणीसाठा अपुरा पडू शकतो. त्यामुळे किमान १० टक्के पाणीकपात करावी लागणार आहे. त्यामुळे पुढील ८ दिवसांत जलसाठ्याचा आढावा घेऊन याविषयी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.