सातारा तहसील कार्यालयात वाहनतळ व्यवस्थेची मागणी !

सातारा तहसील कार्यालय

सातारा, २३ जून (वार्ता.) – सातारा तहसील कार्यालयाच्या अपुऱ्या जागेमुळे तेथील वाहतूककोंडी नित्याचीच झाली असून या ठिकाणी वाहनतळ व्यवस्थेची मागणी नागरिक करत आहेत.

वाढत्या लोकसंख्येच्या मानाने सध्याचे तहसील कार्यालय अपुरे पडत आहे. त्यातच सातारा शहरासह संपूर्ण तालुक्यातील तहसीलशी संबंधित सर्व कामे पार पाडण्यासाठी परगावाहून नागरिक येथे येत असतात; मात्र या ठिकाणी वाहने लावण्यासाठी जागा अपुरी असल्याने त्यांना वाहन लावण्यासाठी इतर पर्याय शोधावे लागतात. तहसील आवारात जागा तर अपुरी आहेच, शिवाय अव्यवस्थित वाहने लावल्यास वाहतूककोंडी होते ही गोष्ट निराळीच ! याचाच अपलाभ घेत वाहतूक नियंत्रण विभाग ‘नो पार्किंग’मध्ये वाहन लावल्याचा बहाणा करत नागरिकांकडून दंड उकळत असतो, अशी तक्रार नागरिक करतात. याविषयी अनेक वेळा वादावादी आणि हाणामारी यांचे प्रसंग घडले आहेत. यावर जुजबी उपाय काढून शासकीय अधिकारी वेळ मारून नेतात; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही.

संपादकीय भूमिका

वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहनतळाची साधी व्यवस्थाही न करणारे सातारा प्रशासन अकार्यक्षम !