जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने मार्गस्थ !
पुणे – टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे २२ जून या दिवशी पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत आगमन झाल्यानंतर शहराच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांचा महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी दिंडी प्रमुखांना पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांना वैद्यकीय उपचारासाठी प्रथमोपचार पेटी, महापालिका प्रशासन आणि त्यांचे संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका, मूल्यशिक्षण अभ्यासपुस्तिका भेट देण्यात आली.
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातून २२ जून या दिवशी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखीचे चित्र डोळ्यासमोर उभे करणारे सुंदर शिल्प उभारण्यात आले आहे. या शिल्पाचे उद्घाटन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.