हिंदु मुलीला पळवल्यामुळे नव्हे, तर अतिक्रमणामुळे घर पाडले !
घर पाडलेल्या आसिफ नावाच्या तरुणाच्या याचिकेवर मध्यप्रदेश सरकारचे उत्तर
कानपूर (उत्तरप्रदेश) – मध्यप्रदेशच्या दिंडोरी जिल्ह्यातील शहपुरा येथील निवासी आसिफ नावाच्या मुसलमान युवकाने त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याच्या विरोधात मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यामध्ये त्या तरुणाने एका हिंदु मुलीला पळवून नेल्याच्या आरोपावरून त्याचे घर पाडण्यात आल्याचा आरोप सरकारवर केला होता. या याचिकेवर सरकारने उत्तर दिले असून त्यामध्ये हिंदु मुलीला पळवल्यामुळे नव्हे, तर अतिक्रमणामुळे घर पाडण्यात आल्याचे स्पष्ट केले.
शहपुरा पोलिसांनी ५ एप्रिल २०२२ या दिवशी आसिफच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी हिंदु मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत ‘आसिफने हिंदु मुलीला बलपूर्वक बसमधून उतरवून पळवून नेले’, असा आरोप केला होता. त्यानुसार त्याच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला. याविरोधात आसिफने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. ‘सरकारने माझ्या वडिलांचे घर आणि भावाचे दुकान पाडले आहे’, असाही आरोप या याचिकेत करण्यात आला होता.
या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगितले होते. यावर सरकारच्या वतीने ‘तरुणाविरुद्ध तक्रार प्रविष्ट झाल्यामुळे त्याच्या वडिलांचे घर पाडण्यात आलेले नाही. अतिक्रमणाविषयी तरुणाच्या वडिलांना रीतसर नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. तरुणाचे वडील ३० मार्च या दिवशी समितीसमोर उपस्थितही झाले होते. समितीला अतिक्रमण आढळून आल्याने ६ एप्रिल या दिवशी ते पाडण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच तरुणाच्या विरोधात तक्रार प्रविष्य होण्यापूर्वीच अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई चालू करण्यात आली होती’, असे न्यायालयाला सांगितले. (असे असेल, तर खोटी याचिका प्रविष्ट करून न्यायालयाचा वेळ वाया घालावल्यामुळे याचिकाकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे जनतेला वाटते ! – संपादक)