सद्गुरु अनुराधा वाडेकर सत्संगात भाववृद्धीसाठी प्रयोग घेत असतांना मुंबई येथील श्री. बळवंत पाठक यांनी अनुभवलेली भावस्थिती !
‘प्रतिदिन सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा साधकांसाठी सत्संग असतो. या सत्संगात सकाळी एक घंटा नामजप, त्यानंतर व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांची सूत्रे घेतली जातात. नामजपाच्या आरंभी सद्गुरु अनुराधाताई भाववृद्धीसाठी विविध प्रयोग करवून घेतात. त्यामुळे सर्व साधकांचा नामजप भावपूर्ण होतो. ५.११.२०२१ या दिवशी या सत्संगात सद्गुरु अनुराधाताईंनी भाववृद्धीसाठी घेतलेल्या प्रयोगानंतर नामजप करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी ‘आपण ‘ॐ निर्विचार’ हा नामजप करत रामनाथी आश्रमाला मानस प्रदक्षिणा घालत आहोत’, असा प्रयोग करत नामजप करायला सांगितल्यावर अनुभवलेली भावस्थिती
अ. ‘ॐ निर्विचार’ हा नामजप करत मी रामनाथी आश्रमाला मानस प्रदक्षिणा घालतांना मला रामनाथी आश्रम म्हणजे ‘प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) समष्टी रूप आहे’, असे जाणवून माझा नामजप भावपूर्ण होऊ लागला.
आ. नंतर या प्रदक्षिणेची कक्षा विस्तारून प.पू. गुरुदेवांच्या कृपेने ‘मी संपूर्ण गोवा राज्याला प्रदक्षिणा घालत आहे’, असे मला वाटले.
इ. त्यानंतर हळूहळू प.पू. गुरुदेवांचे रूप विराट होत गेले. त्यामुळे प्रदक्षिणेचा परीघ वाढून ‘मी भारतमातेला प्रदक्षिणा घालत आहे’, असे मला जाणवले.
ई. प.पू. गुरुदेवांचे रूप अजून विराट होत गेले. त्यामुळे प्रदक्षिणेचा परीघ आणखी वाढून ‘मी पूर्ण पृथ्वीलाच प्रदक्षिणा घालत आहे. प.पू. गुरुदेव म्हणजे संपूर्ण पृथ्वीच आहे’, असे मला जाणवले.
उ. शेवटी ‘मी प.पू. गुरुदेवांच्या चरणांशी नतमस्तक होत माझे मस्तक त्यांच्या चरणी ठेवून त्यांना शरण गेलो. ‘गुरुदेवांच्या चरणांशी सर्वकाही सामावलेले असून ही पृथ्वी, अंतरीक्ष सर्वकाही गुरुदेवांच्या चरणांशीच आहे’, असे मी अनुभवले.
२. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी ‘आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या चरणाच्या अंगठ्याच्या नखाच्या पोकळीत बसलो असून तिथे पुष्कळ तेज आणि चैतन्य जाणवत आहे’, असा प्रयोग करत नामजप करायला सांगितल्यावर अनुभवलेली भावस्थिती
अ. ‘प.पू. गुरुदेवांच्या नखाच्या पोकळीमध्ये मी एखाद्या धुळीच्या कणाप्रमाणे अधांतरी असून त्यांच्या कृपेमुळेच मी त्या ठिकाणी राहून नामजप करू शकत आहे’, असे मला जाणवले.
आ. मला नखाच्या पोकळीमध्ये मोठ्या प्रमाणावर सूर्याचा तेजोमय प्रकाश दिसला.
इ. माझ्या मनात येणाऱ्या विचारांचे प्रमाण न्यून झाले आणि मला माझ्या मनातील विचारांवर नियंत्रण मिळवता आले.
ई. ‘माझ्यावरील त्रासदायक शक्तींचे आवरण दूर होऊन मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.
उ. माझा नामजप एकाग्रतेने झाला.
प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला वरील अनुभूती आल्या. त्या अनुभूती मी त्यांच्या चरणी अर्पण करतो.’
– श्री. बळवंत पाठक, मुंबई (५.११.२०२१)
|