‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या पाचव्या दिवसाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

१६.६.२०२२ या दिवशी गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानामध्ये दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.

श्री. राम होनप

१. पू. परमात्माजी महाराज, धारवाड, कर्नाटक.

अ. प्रतिदिन अधिवेशनाच्या ठिकाणी मला सूक्ष्मातून अधून-मधून वाईट शक्ती दिसायच्या. आज प्रथमच त्या ठिकाणी सूक्ष्मातून मला अनेक देवी दिसल्या. त्यामुळे वातावरण आनंदमय झाले होते.

आ. पाताळांतून असंख्य सूक्ष्मातील ‘काळे कण’ अधिवेशानाच्या ठिकाणी येतांना दिसले आणि त्याच वेळी वातावरणात अकस्मात् ‘चंदेरी’ आणि ‘सोनेरी’ दैवी कण प्रकट झालेले दिसले. त्या वेळी ‘आसुरी (काळे) कण आणि दैवी कण’ यांमध्ये सूक्ष्मातून युद्ध चालू होते. ‘देव आणि असुर यांच्यात शस्त्रांद्वारे युद्ध व्हायचे’, असे यापूर्वी मी पौराणिक कथांतून ऐकले होते. आज प्रथमच ‘आसुरी कण आणि दैवी कण’ यांच्यातील सूक्ष्मयुद्ध पहायला मिळाले. या सूक्ष्मयुद्धात कधी आसुरी कण, तर कधी दैवी कण नष्ट व्हायचे.

इ. सूर्यकिरण भूमीवर पडतांनाचे दृश्य दिसते, त्याप्रमाणे पांढऱ्या रंगाचे ईश्वरी किरण अधिवेशनाच्या ठिकाणी दिसत होते. त्यामुळे वातावरणात चैतन्य जाणवत होते.

२. श्री. सुभाष वेलिंगकर, भारत माता की जय संघ, गोवा.

अ. श्री. वेलिंगकर मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘गोव्याचा पालनकर्ता फ्रान्सिस झेवियर नसून भगवान परशुराम आहे’’, हे वाक्य न आवडल्याने सूक्ष्मातून एक वाईट शक्ती रागाने डोळे वटारून अधिवेशनाकडे पहात होती.

आ. श्री. वेलिंगकर ‘धर्मकार्य करतांना त्यांना राजकारणी आणि प्रसारमाध्यमे यांद्वारे कसा विरोध झाला ?’, याविषयी सांगत होते, तेव्हा ‘हा विषय श्रोत्यांना समजू नये’, यासाठी एक वाईट शक्ती स्वतःच्या तोंडातून काळाधूर वातावरणात पसरवत होती.

३. श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

अ. सनातन संस्थेच्या वतीने भारतात विविध ठिकाणी जाऊन हिंदु राष्ट्रासाठी ‘हिंदूंचे संघटन कसे करण्यात आले ?’ याविषयीची माहिती श्री. चेतन राजहंस यांनी श्रोत्यांना सांगितली. त्या वेळी सूक्ष्मातून एक वाईट शक्ती हिरव्या रंगाचा मायावी धूर वातावरणात निर्माण करून श्रोत्यांचे लक्ष विचलित करत होती.

आ. तेलंगणा राज्यात मुसलमान आणि आंध्रप्रदेशमध्ये ख्रिश्चन यांचे वर्चस्व वाढत आहे, हा विषय श्री. चेतन सांगत असतांना वाईट शक्तींनी अधिवेशनावर सूक्ष्मातून मोठी आक्रमणे चालू केली. त्यामुळे वातावरणात दाब निर्माण झाला.

इ. श्री. चेतन यांच्या बोलण्यातून वातावरणात चैतन्याचे प्रक्षेपण होत असल्याने हा विषय श्रोत्यांच्या अंतर्मनापर्यंत सहजतेने पोचत होता. यावरून धर्मकार्य करतांना साधकाने स्वतः साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते.

४. पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती.

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यापूर्वी विविध प्रसंगी राष्ट्र आणि धर्म यांविषयी विचार मांडले आहेत. त्याचे वाचन पू. सिंगबाळ यांनी केले. त्या वेळी पाताळांतील मोठी वाईट शक्ती सूक्ष्मातील आक्रमणांसाठी वेगाने कार्यरत झाल्या.

आ. पाताळांत वाईट शक्तींनी एक बैठक घेतली. त्यात त्यांनी ‘जयतु जयतु असुर राष्ट्रम् ।’, असा जयघोष करण्यास आरंभ केला. अधिवेशनाच्या ठिकाणी धर्मप्रेमी अधूनमधून ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, असा जयघोष करतात. त्याला विरोध करण्यासाठी असुरांनी वरीलप्रकारे नवीन जयघोष चालू केला.

इ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या विविध विचारांतून वातावरणात पुष्कळ चैतन्य पसरले होते. त्यामुळे पाताळांतील असुरांना अधिवेशनाच्या ठिकाणी श्रोत्यांवर सूक्ष्मातून आक्रमणे करता येत नव्हती. त्यामुळे पाताळांतूनच वाईट शक्तींनी अधिवेशनाच्या ठिकाणी काळ्या रंगाचे बाण आणि भाले सोडले, तसेच ‘काळे विषारी सर्प, वटवाघळे, अक्राळ-विक्राळ तोंडवळे असलेले पक्षी’ अधिवेशनाच्या ठिकाणी पोचण्यासाठी तळमळू लागले.

ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या विचारांत चैतन्य आहे आणि ते विचार वाचून दाखवणारे पू. सिंगबाळ यांच्या वाणीतही चैतन्य आहे. त्यामुळे या विषयाने श्रोत्यांवरील आवरण दूर होऊन त्यांच्या अंतर्मनाची शुद्ध होत होती.

उ. एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षपणे आक्रमक कृती करता येत नाही, त्या वेळी तो हात-पाय आपटून स्वतःचा राग व्यक्त करतो, त्याप्रमाणे वाईट शक्तींना अधिवेशनाच्या ठिकाणी सूक्ष्मातून कुठलेही आक्रमण करता येत नसल्याने ते पाताळांत स्वतःचे पाय आपटून राग व्यक्त करत होत्या. त्याचा नाद मला सूक्ष्मातून ऐकू येत होता.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या ध्वनीचित्र-चकतीचे प्रसारण

२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त गोवा येथे काढण्यात आलेल्या रथोत्सवाची ध्वनीचित्र-चकती अधिवेशनात धर्मप्रेमींना दाखवण्यात आली. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहे.

अ. वातावरणात ‘चैतन्य’ आणि ‘आनंद’ यांलहरींचे प्रक्षेपण होत होते.

आ. मला अधिवेशनाच्या ठिकाणी सूक्ष्मातून वाईट शक्ती दिसत नव्हत्या. तेथे केवळ ईश्वराचे अस्तित्त्व जाणवत होते.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.६.२०२२)

(सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांना वाईट शक्तींनी थकवा आणल्यामुळे परीक्षण करता आले नाही आणि श्री. निषाद देशमुख यांना वाईट शक्तींच्या त्रासामुळे शारीरिक त्रास झाले अन् त्यामुळे त्यांना अधिवेशनस्थळी येता आले नाही.)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • दैवी कण :  सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक