राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून बैठकीचे आयोजन !
अग्नीपथ योजनेमुळे हिंसक आंदोलन चालू असल्याचे प्रकरण
जळगाव – केंद्रशासनाने घोषित केलेल्या अग्नीपथ योजनेमुळे अनेक राज्यांमध्ये हिंसक आंदोलन चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात तरुणांनी शांतता आणि सुव्यवस्था राखावी, यासाठी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांची ऑनलाईन बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्हिडिओद्वारे तरुणांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
‘इतर राज्यांत चालू असलेल्या हिंसक आंदोलनात सहभागी होऊ नका. या योजनेच्या संदर्भात आपल्या मागण्या, सूचना किंवा काही पालट सुचवायचे असल्यास सनदशीर मार्गाने अनुमती घेऊन आंदोलन करा, निवेदन द्या. हिंसक आंदोलनात सहभाग झाल्याचे आढळून आल्यास त्यांची नोंद घेतली जाईल आणि आक्षेप नोंदवले जातील. पोलीस किंवा सैन्यासह कोणत्याही सरकारी नोकरीत संबंधित पात्र ठरणार नाही’, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.