सनातन धर्म, संस्कृती आणि परंपरा यांची पताका विश्वभर फडकावण्याची वेळ आली आहे !
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी राजस्थान येथील लेखक विवेक मित्तल यांचा संदेश !
माझ्या धर्मनिष्ठ बंधूंनो,
हिंदु राष्ट्राची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला देशभरातून उपस्थित असलेल्या सर्व सनातन बंधूंना माझा सप्रेम नमस्कार !
हिंदु राष्ट्राच्या निमित्ताने या अधिवेशनामध्ये गांभीर्याने चिंतन-मनन आणि मंथन होईल. या मंथनानंतर जे अमृत प्रकट होईल, ते निश्चितच संपूर्ण भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी लाभदायक, कल्याणकारी आणि संकल्पाची पूर्तता करणारे असेल. धर्मापासून लांब गेल्याने व्यक्तीचे पतन होते. सनातन धर्मामध्ये संपूर्ण विश्वाला एक कुटुंब समजण्यात आले आहे, ज्यात जगातील प्रत्येक जिवाप्रती सहृदयता, मानवीयता, संवेदनशीलता, अहिंसा, त्याग आदींना प्रमुख स्थान देण्यात आले आहे; परंतु सनातन धर्मीय आणि धर्मरक्षकहो, आता आपण ‘भाईचारा’मधला चारा बनणे थांबवण्याची आणि मोठ्या भावाच्या अधिकारांचा वापर करून सनातन धर्म, संस्कृती आणि परंपरा यांची पताका पुन्हा दृढतापूर्वक विश्वभर फडकावण्याची वेळ आली आहे. आपण सर्व मिळून धर्मजागरणाचे कार्य करूया आणि संपूर्ण भारताला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी आपल्या सामर्थ्यानुसार आहुती प्रदान करूया. राष्ट्र निर्माण करण्यासाठी स्वत:चे चरित्र निर्माण करणे आवश्यक आहे आणि चरित्र निर्माण करण्यासाठी धर्माचरण अन् सृष्टीच्या नियमाप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण हिंदु राष्ट्राची संकल्पना साकार करण्यात यशस्वी होऊ.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे सर्व संकल्प सिद्ध होऊ देत आणि वैश्विक स्तरावर संपूर्ण मानवतेला मार्गदर्शन करण्यासाठी भारत पुन्हा सक्षम होऊ दे’, अशी माझी परमपिता परमेश्वराला प्रार्थना आहे.
– श्री. विवेक मित्तल, लेखक, पत्रकार आणि समाजसेवक, राजस्थान. (१२.६.२०२२)