संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यात आगमन, आकुर्डी येथे मुक्काम !
पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे २१ जून या दिवशी पुण्यात आगमन होणार असून वारकऱ्यांचे स्वागत आणि सेवेसाठी पुणे महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. ‘उंच पताका झळकती, टाळ-मृदंग वाजती’, अशा हर्षोल्हासित आणि पावसाळी वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी २० जून या दिवशी देहूतून प्रस्थान केले आहे. पालखीने मानाच्या अश्वांसमवेत मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली आणि ती इनामदार साहेब वाड्यात मुक्कामासाठी पोचली. २१ जून या दिवशी पालखी आकुर्डी येथे मुक्कामासाठी असणार आहे.
पालखी सोहळ्याचे ३३७ वे वर्ष आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेली २ वर्षे पायी सोहळा होऊ न शकल्यामुळे या वेळी वारकऱ्यांच्या तोंडवळ्यावर प्रस्थान सोहळ्यात सहभागी होत असल्याचा आनंद दिसत होता.