मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १० टक्के पाणीसाठा शेष !
मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या धरण क्षेत्रात लवकरच समाधानकारक पाऊस पडला नाही, तर यंदा मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या धरणांमध्ये सध्या केवळ १० टक्के पाणीसाठा शेष आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जलसाठा खालावला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी पाणीसाठा उत्तम होता; मात्र २० जूनच्या आकडेवारीनुसार जलसाठा मागील दोन वर्षांच्या तुलनेत खालावला आहे. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणांमधून मुंबईला प्रतिदिन ३ सहस्र ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच तलावातील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल या दृष्टीने पालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे नियोजन करण्यात येते.