चारचाकी गाडीवर विजेचा खांब पडल्यावर झालेल्या अपघातात गुरुकृपेने कोणत्याही प्रकारची दुखापत न होणे
१. चारचाकी गाडीने प्रवास करतांना विजेचा खांब तुटून तो गाडीवर पडणे
३१.१२.२०२१ या दिवशी चारचाकी गाडीने मी आणि ४ साधक नोएडाहून मथुरेला जात होतो. थोड्याच वेळात आम्ही मथुरा येथील ‘शिवासा कॉलनी’मधील आमच्या घरी पोचणार होतो. आम्ही ‘कॉलनी’च्या मुख्य प्रवेशद्वारापासून केवळ ५० मीटर अंतरावर होतो. माझ्या चारचाकीच्या पुढे एक ट्रक (मालगाडी) होता. त्या ट्रकमध्ये अगदी वरपर्यंत सामान भरले होते. मार्गावरील विजेच्या तारा त्या सामानात अडकल्या आणि तो ट्रक त्या तारांना तसाच ओढत पुढे चालला होता. त्यामुळे तेथील विजेचा काँक्रीटचा खांब तुटून माझ्या गाडीवर पडला.
२. विजेचा खांब गाडीच्या पुढील भागावर पडल्यामुळे साधकांना काही इजा न होणे आणि गुरुकृपेने धातूच्या भागाला हात न लावण्याचे सुचल्यामुळे विजेचा धक्का लागण्यापासून वाचणे
विजेचा खांब गाडीच्या पुढच्या बळकट भागावर पडला. गाडीवर खांब पडल्यामुळे गाडीचे पुढचे ‘विंडशील्ड’ (काच) पूर्णपणे फुटले आणि गाडीची अन्यही पुष्कळ हानी झाली; परंतु गुरुदेवांच्या कृपेमुळेच आम्हा चौघांना साधे खरचटलेही नाही. तो खांब गाडीच्या मध्यभागावर पडला असता, तर आम्हाला पुष्कळ मार लागला असता. हा अपघात पहाणाऱ्यांनी मला सांगितले, ‘‘त्या वेळी विजेच्या तारांमधूनही विजेच्या ठिणग्या (स्पार्क) पडत होत्या’’; मात्र गुरुकृपेने ‘गाडीतील धातूच्या कोणत्याही भागाला हात लावायचा नाही’, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही विजेचा धक्का (शॉक) लागण्यापासून वाचलो.
‘या प्रसंगात प्रत्येक क्षणी आमच्यावर गुरुदेवांची कृपा होती आणि माझे मनही एकदम शांत होते’, त्याबद्दल मी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
– श्री. हरिकृष्ण शर्मा, नोएडा, उत्तरप्रदेश. (१५.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |