अतीवापर धोकादायक !
लक्ष्मणपुरीमध्ये (उत्तरप्रदेशमध्ये) ‘पबजी’ गेम खेळण्यास विरोध केल्याने १६ वर्षीय मुलाने आईची गोळ्या घालून हत्या केली आणि आईचा मृतदेह ३ दिवस घरात लपवून ठेवला. भाग्यनगर येथील एका १६ वर्षाच्या मुलाने ‘गेम’ची ‘ॲडव्हान्स लेव्हल’ (प्रगत स्तर) गाठायची असल्यामुळे आईच्या अधिकोषातून ३६ लाख रुपये काढले. ठाणे येथेही ३ मित्रांनी ‘पबजी गेम’ खेळतांना झालेल्या वादातून एकाची हत्या केली. गेल्या काही दिवसांतील ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. ‘ऑनलाईन गेमिंग’ हा प्रकार इतका भयानक बनला आहे की, या ‘गेम’साठी आजचे युवक चोरी, अधिकोषातून पैसे काढणे इतकेच काय, तर स्वत:च्या पालकांची हत्या करण्यासारखे टोकही गाठत आहेत. भारतातील युवापिढीचे हे अध:पतन निश्चितच चिंताजनक असून या ‘गेम’रूपी विषवल्लीला रोखणे अनिवार्य बनले आहे.
एका अहवालानुसार कोरोनानंतर भारतातील मुलांचे वजन ५ किलोने वाढले आहे. यामध्ये अनेक कारणांपैकी ‘ऑनलाईन गेमिंग’ हे एक प्रमुख कारण आहे. मुले एकाच ठिकाणी बसून ‘गेम’ खेळतात. त्यामुळे बाहेर मैदानावर जाऊन खेळणे, हा प्रकार बहुतांश बंदच झाला आहे. ‘भ्रमणभाष आणि त्या संबंधातील सर्व गोष्टी हेच आता युवकांचे सर्वस्व बनत चालले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६ व्या वर्षी ‘स्वराज्य’ स्थापनेची शपथ घेतली ! माधवराव पेशव्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवेपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हिंदूंची मंदिरे आणि मूर्ती फोडणाऱ्या निजामाशी लढाई केली. याउलट आजचे तरुण ‘ऑनलाईन’ खेळ खेळण्यात मग्न झाले आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी पालक, शिक्षक आणि सरकार अशा सर्व स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. आजच्या तरुणांना प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, माधवराव पेशवे, क्रांतीकारक यांचा आदर्श मानायला शिकवायला हवे.
विज्ञानाने मानवाला अनेक भौतिक सुविधा दिल्या; परंतु त्याचा वापर किती वेळ करावा ? हे विज्ञान शिकवू शकत नाही, हे वरील उदाहरणांवरून सिद्ध होते. ‘अती तेथे माती’ होऊ नये, यासाठी मनावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. षड्रिपू नियंत्रणात असतील, तरच हे शक्य आहे. ते नियंत्रणात ठेवायला विज्ञान नव्हे, तर अध्यात्मच हवे, हे नक्की !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर