आर्द्रता, पंचामृत आणि भाविकांचा चरणस्पर्श यांमुळे मूर्तींची २५ वर्षांतच १.२५ मि.मी.पर्यंत झीज !
|
संभाजीनगर – गाभाऱ्यातील आर्द्रता, पंचामृत आणि कोट्यवधी भाविकांचा चरणस्पर्श यांमुळे अशा मूर्तींची २५ वर्षांतच १.२५ मि.मी.पर्यंत झीज होते. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींचीही झीज झाल्याचे निदर्शनास आले होते. झीज रोखण्याच्या उद्देशाने ‘दळणवळण बंदी’च्या काळात एप्रिल २०२० मध्ये संभाजीनगर येथील ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण’च्या (ए.एस्.आय) पथकाने विठ्ठलमूर्तीला वज्रलेप लावून शुचिर्भूत केले.
१. प्रतिवर्षी दर्शनासाठी १ कोटींहून अधिक भाविकांचा ओघ असलेले तिरुपति बालाजी आणि शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर यांसह अनेक मंदिरे भारतात आहेत. तेथे विशिष्ट अंतरावरूनच मूर्तींचे दर्शन घ्यावे लागते.
२. पंढरपूर येथे वर्षाकाठी सव्वा ते दीड कोटी भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींचे पदस्पर्श दर्शन घेतात. इतक्या प्रचंड संख्येने मूर्तीला स्पर्श करू देत भाविकांना दर्शनाचे आत्मिक समाधान देणारे हे देशातील एकमेव मंदिर आहे.
३. विठ्ठलाच्या मूर्तीला सुरक्षित आच्छादन (‘प्रोटेक्टिव्ह कोटिंग’) करून सुरक्षित केले; मात्र रुक्मिणीमातेच्या मूर्तीला आच्छादन केले नव्हते. वर्ष २०२२ मध्ये तिच्या पायांच्या १० बोटांची झीज झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे पुरातत्व विभागाच्या तज्ञ पथकाने १२ जून या दिवशी मूर्तीच्या १० बोटांचे ‘रिस्टोरेशन’ करून पूर्ववत् केले.
४. यापुढे ‘चरणस्पर्श करतांना अन् पंचामृताने स्नान घालतांना काळजी घ्यावी’, अशी सूचना पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर मंदिराच्या विश्वस्तांना दिली आहे.
आर्द्रता, पंचामृत अभिषेक आणि चरणस्पर्श यांमुळे मूर्तीची झीज अधिक !
तज्ञांच्या माहितीनुसार, काळ्या पाषाणातील मूर्ती सहस्रो वर्षे सुस्थितीत असते; परंतु या ठिकाणी पंचामृताने होणाऱ्या अभिषेकामुळे ॲसिड निर्माण होऊन मूर्तीला छिद्र पडू लागते. नंतर त्यावर पापुद्रे पडण्याची भीती असते. मंदिरांतील आर्द्रता, तसेच पंचामृताचा अभिषेक यांमुळे १०० वर्षांत मूर्तीची २ ते २.५ मि.मी. झीज होऊ शकते; मात्र मूर्तीला कोट्यवधींचा स्पर्श होत असल्याने ५० वर्षांतच २ ते २.५ मि.मी. झीज होते. भाविकांनी चरणस्पर्श केल्यामुळे मूर्तीला गुळगुळीतपणा येतो. प्रतिदिन पंचामृताचा अभिषेक केला, तर मूर्तीचा दगड ठिसूळ होत जातो. जी झीज १०० वर्षांत व्हायची, ती ५० वर्षांतच होते. रुक्मिणीच्या चरणांवर सतत कुंकू आणि पूजेचे पदार्थ ठेवल्यानेही झीज होते. पंचामृताने स्नान घातल्यानेही मूर्तीची झीज होते; पण पदस्पर्श हे प्रमुख कारण असते.
‘इपॉक्सी आणि रेझिन यांचा वापर करून बोटांना पूर्वीसारखा आकार दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंदिर समितीच्या विश्वस्तांसह आमची बैठक घेतली होती. त्यात रुक्मिणीच्या बोटांची झीज झाल्याचे समोर आले. आषाढी एकादशीपूर्वीच हे काम व्हावे’, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. सेवाभाव म्हणून आम्ही नि:शुल्कपणे मूर्तीचे काम केले’, अशी माहिती पुरातत्व रसायनतज्ञ उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले. |