राणी लक्ष्मीबाईंचा लढाऊ बाणा आजच्या युवतींमध्ये यायला हवा ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर
सातारा, २० जून (वार्ता.) – राणी लक्ष्मीबाईंसारखी एक स्त्री इंग्रजांविरोधात लढते. आपला देह त्यांच्या हाती लागू नये, यासाठी मृत्यूला कवटाळते. यातून तिचे शौर्य लक्षात येते. राणी लक्ष्मीबाईंचा लढाऊ बाणा स्वरक्षणासाठी आजच्या युवतींच्या अंगी यावा, हीच राणी लक्ष्मीबाई यांना खरी मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले. व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त शाहूपुरी येथील हुतात्मा स्मारक (फाशीचा वड) ते राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर धावडशी ग्राम, अशा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
प्रार्थना, राष्ट्रगीत म्हणून आणि हुतात्मा क्रांतिवीरांना अभिवादन करून पदयात्रेस प्रारंभ झाला. पदयात्रेचा समारोप लेखक जगन्नाथ शिंदे यांच्या व्याख्यानाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब शेरेकर यांनी, तर आभारप्रदर्शन दीपक जाधव यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्रांतिकारकांच्या जन्मस्थळी, स्मृतीस्थळी पदयात्रा आणि सायकल स्वाऱ्या (रॅली) काढण्यात येत आहेत. यामध्ये प्रीतीसंगम, कराड ते येडेमच्छिंद्र, वाई ते कवठे, नाशिक ते भगूर, सासवड ते भिवंडी, आळंदी ते राजगुरुनगर, धर्मवीरगड ते वढू बुद्रुक, राजगड ते रायगड अशा विविध ठिकाणांचा समावेश आहे.