साधिकेला विमानतळावर पोचण्यास अडचण येऊनही गुरुकृपेने ती वेळेत पोचणे

१. साधिकेने विमानतळावर जाण्यासाठी टॅक्सी आरक्षित करणे; पण ती वेळेवर न आल्याने आणि आश्रमातही अनुभवी चालक उपलब्ध नसल्यामुळे अडचण निर्माण होणे

श्री. विश्वनाथ कुलकर्णी

एप्रिल २०२१ मध्ये वाराणसी सेवाकेंद्रात अनेक साधक आजारी होते. त्या वेळी बाहेरील सेवा करण्यासाठी केवळ मी एकटाच उपलब्ध होतो. मी प्रसाराच्या सेवेत असल्याने मला आश्रमसेवेतील विशेष अनुभव नव्हता. एका साधिकेला विमानतळावर जाण्यासाठी पहाटे ४ वाजता आश्रमातून निघायचे होते. त्यासाठी तिने टॅक्सी (ओला कॅब) आरक्षित केली होती; परंतु पहाटे ४.३० वाजले, तरी टॅक्सी चालकाचा संपर्क होत नव्हता. आजूबाजूला रिक्शाही मिळणे शक्य नव्हते.

२. ऐनवेळी दुचाकीवरून साधिका आणि तिची मोठी बॅग घेऊन जाण्यास कठीण वाटणे

आश्रमात केवळ दुचाकी (स्कूटी) वाहन होते. त्यावरून साधिका आणि तिची मोठी बॅग घेऊन जाणे अत्यंत अवघड होते. मला शारीरिक मर्यादा असल्याने वेगाने वाहन चालवण्यास कठीण जाते. आश्रमापासून विमानतळ साधारण २७ कि.मी. दूर आहे. त्यामुळे हळूहळू वाहन चालवून विमानतळावर वेळेत पोचणे मला अशक्य वाटत होते.

३. ‘गूगल मॅप’ लावून प्रवास करणे आणि वाहन आपोआप वेगाने चालत असल्याचे जाणवणे अन् ‘परात्पर गुरुदेव डॉ. आठवले समवेत आहेत’, या भावाने साधिकेला वेळेत विमानतळावर पोचवणे

थोड्या वेळाने साधिकेला दुचाकीवरून नेण्यावाचून ‘काही पर्याय नाही’, हे माझ्या लक्षात आले. आम्ही देवाला शरण जाऊन प्रार्थना केली आणि विमानतळावर जाण्यास निघालो. आम्हाला मार्गही (रस्ताही) ठाऊक नव्हता. शेवटी ‘गूगल मॅप’ (गूगल नकाशा) लावून आम्ही अंदाजाने प्रवास केला. या परिस्थितीमध्ये वाहन चालवतांना ‘वाहन आपोआप चालत आहे’, असे मला अनेकदा जाणवले. पायाजवळ मोठी बॅग ठेवल्याने मला बराच वेळ पाय अधांतरी ठेवावे लागत होते, तरीही मी ५० कि.मी. वेगाने वाहन चालवून केवळ ५० मिनिटांत विमानतळावर पोचलो. या पूर्ण प्रवासात माझे पायही दुखले नाहीत आणि मला कसलाच त्रास झाला नाही. ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) समवेत आहेत आणि आम्हाला घेऊन जात आहेत’, असे मला जाणवत होते.

– श्री. विश्वनाथ कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), वाराणसी. (३०.५.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक