श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ समवेत असल्याचे जाणवून ‘बेंगळुरू ते पनवेल’ हा ९५० कि.मी प्रवास एकट्याने सहजतेने होणे
१. ‘बंगळुरू ते पनवेल’ हा ९५० कि.मी. प्रवास चारचाकीने एकट्याने करायचा असतांना ‘समवेत कुणीतरी असावे’, असे वाटणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रार्थना करून निघणे
‘१९.१.२०२२ या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना भेटून मी बेंगळुरूहून वैयक्तिक चारचाकीने सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पनवेलला जाण्यास निघालो. मला अनुमाने ९५० कि.मी. प्रवास एकट्याने करायचा असल्याने माझ्या मनाची चलबिचल होत होती. ‘प्रवासात माझ्या समवेत कोणीतरी असावे’, असे मला वाटत होते; पण तसे होणार नव्हते. मी एकटाच एवढा मोठा प्रवास करणार होतो. मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना प्रार्थना करून निघालो.
२. शेजारच्या सीटवर २ फुले दिसणे, ‘आदल्या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्या सीटवर बसल्या होत्या आणि ती त्यांच्या गजऱ्यातील फुले आहेत’, हे लक्षात येणे अन् त्या सूक्ष्म रूपात समवेत असल्याचे जाणवणे
मी चारचाकीने काही अंतर पुढे आल्यावर ‘गाडीत कोणीतरी आहे’, असे मला वाटत होते. ‘माझ्या शेजारच्या सीटवर कोणीतरी बसले आहे’, असे मला सतत जाणवत होते. नंतर थोडसे पुढे आल्यावर एके ठिकाणी चारचाकी थांबवून मी सहजच शेजारच्या सीटकडे बघून नमस्कार केला. तेव्हा मला दिसले, ‘शेजारच्या सीटवर २ फुले आहेत.’ आदल्या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्या सीटवर बसल्या होत्या आणि त्यांच्या गजऱ्यातील २ फुले त्या सीटवर पडली होती. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मला जो भास होत होता, तो भास नव्हताच ! श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सूक्ष्म रूपात माझ्या समवेत आहेत.’
३. ‘ती २ फुले, म्हणजे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पूर्ण प्रवासात समवेत आहेत’, असे वाटणे अन् ९५० कि.मी. अंतर अवघ्या १४ घंट्यांत पार करणे
‘त्या प्रवासात मी एकटा आहे’, असे मला वाटले नाही. माझा मधून मधून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी संपर्क होत होता. त्यामुळे ‘प्रवास कसा होत आहे ?’, हे मला कळतच नव्हते. मी ९५० कि.मी. अंतर अवघ्या १४ घंट्यांत पार करून पनवेल येथे सुखरूप पोचलो. ‘ती २ फुले, म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पूर्ण प्रवासात माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटले.
४. प्रवास करतांना चारचाकीत ‘डिझेल किती आहे ?’, हे पहाण्याचे लक्षात न येणे आणि ७०० कि.मी. अंतर पार करूनही चारचाकीने डिझेल न्यून झाल्याचे न दाखवणे
मी सतत चारचाकी चालवत होतो; पण ‘चारचाकीत डिझेल किती आहे ?’, हे पहाण्याचे माझ्या लक्षातच आले नाही. ज्या वेळी मला याची जाणीव झाली, त्या वेळी चारचाकीने ७०० कि.मी. अंतर पार केले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गाडीत डिझेल न्यून झाले की, तसे दाखवले जाते; पण चारचाकीने ७०० कि.मी. अंतर पार करूनही तसे दाखवले गेले नाही.
मला या अनुभूती दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– डॉ. दीपक जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जानेवारी २०२२)
|