शब्दचातुर्याने इतरांना हरवून स्वतः नामानिराळे रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘अनेकदा मला वाटते, ‘माझे नाव हे ‘वीरेंद्र इचलकरंजीकर’ इतकेच राहिले नाही, तर त्याला ‘अधिवक्ता, उच्च न्यायालय’, असे लागले आहे. नंतर केवळ ‘अधिवक्ता, उच्च न्यायालय’ इतकेच राहिले नाही, तर ‘हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष’, असेही लागले आहे. मला लागलेल्या विशेषणांमुळे अनेकदा समाज, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांच्याकडून मला आदर मिळतो. हे कार्य बौद्धिक स्तरावरचे असते; परंतु माझी सेवा ही एखाद्या क्षुद्र वर्णाची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्याप्रमाणे असल्याने मला आदर मिळाला की, स्वतःविषयी हसू येते. एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी माझ्या मनात येणाऱ्या शंका मी त्यांना सांगितल्या. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.
मी : आता माझ्या नावामागे केवळ उच्च न्यायालयाचा अधिवक्ता एवढेच राहिले नाही, तर ‘हिंदु विधीज्ञ परिषदेचा राष्ट्रीय अध्यक्ष’, असेही लागले आहे. मला ‘शासननियंत्रित मंदिर भ्रष्टाचार आणि हिंदूंच्या आतंकवादाच्या खटल्यांमध्ये हिंदूंचा अधिवक्ता’, अशी विशेषणे लागल्याने अनेक वेळा समाजातील व्यक्ती आणि साधक माझ्याकडे आदराने पहातात. तेव्हा मला स्वतःविषयी हसू येते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : का बरे ?
मी : खरे असे आहे, ‘ही सेवा किंवा कार्य म्हणजे एखाद्या इमारतीच्या पहारेकऱ्याकडे गस्तीची सेवा असते; म्हणून त्या इमारतीतील निवासी शांत झोपतात, त्याप्रमाणे आहे. आश्रमात स्वच्छतेची सेवा करणाऱ्या साधकाने ‘कचरा कुठे जमला ? तो कुठे टाकायचा ?’, असे पहायचे असते, तशी आम्हा अधिवक्त्यांची ही सेवा आहे.’ ‘आम्ही खरे तर बौद्धिक स्तरावरचे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आहोत’, हे लक्षात येऊन मला हसायला येते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : बघ ना ! लोकांनी उगाचच माझ्या नावामागे ‘परम पूज्य’ लावून ठेवले आहे.
मी : तुम्ही परम पूज्य आहातच !
परात्पर गुरु डॉ. आठवले : मग तूही अध्यक्ष आणि अधिवक्ता आहेसच ना !
(मी निरुत्तर झालो.)
त्यानंतर माझ्या मनात विचार आले, ‘प्रत्येकाला आपले नाव प्रिय असते. आपण म्हणजे एक देह आणि ‘त्या देहाची वैशिष्ट्ये अन् त्याचे नाव’, असे आपले असते; पण ‘अध्यात्मात ‘स्व’ला विसरायचे असते. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्याने केलेली सेवा म्हणजे खरेतर एका अर्थी हिंदूंच्या, म्हणजेच साधकांच्या रक्षणाची सेवा आहे. रक्षणकर्ता हा काळजी घेणारा, म्हणजेच सेवेकरी असतो.’
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई. (२८.५.२०२२)