श्रेष्ठत्वाचा अहंकार न बाळगता एकमेकांकडून शिकण्याच्या स्थितीत असलेले हिंदुत्वनिष्ठ !
अ. ‘साधनेचे महत्त्व लक्षात आल्यावर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांनी ‘स्वत: साधना करू आणि आमच्या संघटनेतील कार्यकर्त्यांनाही साधना करण्यास सांगू’, असे सांगितले.
आ. अधिवेशनामध्ये विविध क्षेत्रांतील अत्यंत अभ्यासू हिंदुत्वनिष्ठ, तसेच मोठ्या पदांवर कार्यरत असलेले विद्वान उपस्थित होते; परंतु कुणामध्येही श्रेष्ठत्वाचा अहंकार जाणवला नाही. सर्वच जण एकमेकांशी अगदी मोकळेपणाने बोलत होते.
इ. हिंदुत्वनिष्ठांमध्ये शिकण्याचा भाग जाणवला. ‘मी करतो, ते कार्यच मोठे आहे’, असे कुठेच न जाणवता अन्यांचे कार्य समजून घेण्याचा आणि शिकण्याचा भाग त्यांच्यात जाणवला.
ई. सर्वांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची तळमळ प्रचंड वाढली असल्याचे जाणवले.’
– श्री. प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये !
१. ‘भारत हिंदु राष्ट्र व्हावे’, या एका विचाराने जोडलेले विविध प्रांतांतील हिंदुत्वनिष्ठ !
या अधिवेशनामध्ये भारतातील विविध राज्यांसह विदेशातील हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. सर्व हिंदुत्वनिष्ठ विविध प्रांतांतून आले असले, त्यांची बोलीभाषा वेगळी असली, तरी सर्व हिंदुत्वनिष्ठ ‘भारत हिंदु राष्ट्र व्हावे’, या एका विचाराने जोडले होते. त्यामुळे अधिवेशनाला उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये एकमेकांविषयी बंधूता, आत्मीयता आणि प्रेमभाव दिसून आला.
२. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे…’ या समर्थ रामदासस्वामी यांच्या सुवचनानुसार चालणारे अधिवेशन !
समर्थ रामदासस्वामी यांनी ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जें करील तयाचे; परंतु तेथे भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे’, असे म्हटले आहे. या सुवचनाप्रमाणे गोवा येथील दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात भगवंतावर अधिष्ठान ठेवून पुढील धर्मकार्य करण्याची दिशा ठरवली गेली. अधिवेशनाला आलेल्या संघटनांकडे सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याच्या आधारावर करत असलेल्या कार्याला ईश्वराचे अधिष्ठानही आहे. त्यामुळे अधिवेशनातील संघटनांच्या कार्याला यश मिळत असल्याची प्रचीती आली.
३. सूक्ष्म परीक्षणातून साधनेचे महत्त्व हिंदुत्वनिष्ठांना लक्षात येणे
सनातनचे सूक्ष्म ज्ञान-प्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप, ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख यांनी अधिवेशनाचे नियमितपणे सूक्ष्म परीक्षण केले. अधिवेशनाच्या व्यासपिठावरून या सूक्ष्म परीक्षणाची माहिती उपस्थित धर्मप्रेमींना देण्यात आली. यातून धर्मकार्यामध्ये येणारे वाईट शक्तींचे अडथळे आणि कार्याला होणारे दैवी शक्तींचे साहाय्य यांचे, तसेच साधना करण्याचे महत्त्व उपस्थितांच्या लक्षात आले.
४. हिंदु राष्ट्र संसदेच्या माध्यमातून ‘संसदीय कामकाजा’चा आदर्श !
‘लोकशाहीतील संसद आणि विधीमंडळे यांना ‘लोकशाहीची मंदिरे’ म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र या सभागृहांमध्ये आरडाओरडा करणे, राजदंड पळवणे, मारामारी करणे, कागदाचे तुकडे भिरकावणे आदी दंगा करून लोकप्रतिनिधी सभागृहाचे पावित्र्य भंग करतात. ही लोकशाहीची मोठी विटंबना आहे. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये प्रथमच ‘हिंदु राष्ट्र संसद’ हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये लोकशाहीतील संसदीय कामकाजाप्रमाणे सभापती, उपसभापती आणि सचिव या पदांवर हिंदुत्वनिष्ठांची नियुक्ती करून प्रातिनिधीक ‘हिंदु राष्ट्र संसद’ घेण्यात आली. यामध्ये ‘भारतातील शिक्षणप्रणाली’, ‘भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी दिलेल्या वेळेत विषय मांडणे, विषय अभ्यासपूर्ण मांडणे, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वार्थी राजकारणाला काडीचेही स्थान नव्हते. संसदेत विषय मांडणार्या प्रत्येक सदस्याने ‘राष्ट्र आणि धर्म हिताला प्राध्यान्य देऊनच विषय उपस्थित केले. मतभेद असूनही आरडाओरडा न करता सर्वांनी तात्त्विक चर्चा करून अंतिमत: राष्ट्र आणि धर्म हिताच्या ठरावाला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला. ‘हिंदु राष्ट्रामध्ये संसद व्यवस्था कशी असेल ?’ याचा हा आदर्श होता. अशी ही ‘हिंदु राष्ट्र संसद’ या अधिवेशनात वैशिष्ट्यपूर्ण ठरली.’
– श्री. प्रीतम नाचणकर आणि श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’. (१८.६.२०२२)