समिती सेवकांनी तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवून नवीन समिती सेवक निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
फोंडा (गोवा) येथे ‘साधनावृद्धी शिबिरा’चे उद्घाटन
फोंडा (गोवा), २० जून (वार्ता.) – आता भीषण आपत्काळ येणार असल्याने वेळ अल्प आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीच्या सेवकांनी तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवून नवीन समिती सेवक निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समिती सेवकांनी तळमळीने साधना केल्यास त्यांची फलनिष्पत्ती निश्चितच वाढून आध्यात्मिक प्रगती होईल, असे मौलिक मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. २० जून या दिवशी येथे आयोजित केलेल्या ‘साधना शिबिरा’च्या उद्घाटनाप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून ‘साधना शिबिरा’चे उद्घाटन झाले. शिबिराचा प्रारंभ शंखनाद करून आणि भगवान श्रीकृष्णाचा श्लोक म्हणून करण्यात आला. या शिबिरात सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती होती. या शिबिरामध्ये देशभरातून हिंदु जनजागृती समितीचे सेवक सहभागी झाले आहेत.
मार्गदर्शनात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले की,
१. समाजात प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ यांच्या माध्यमांतून विविध उपक्रमांच्या अंतर्गत धर्मप्रसाराच्या कार्यात वाढ झाली आहे. समाजात धर्मकार्य करत असतांना समिती सेवकांनी उपक्रम वाढीसह नवीन समिती सेवक कसे निर्माण होतील ? त्यांच्यात नेतृत्व गुण कसे वृद्धींगत होतील ? यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
२. व्यष्टी साधना हे बीज, तर समष्टी साधना हा वृक्ष आहे. समिती सेवकांनी व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष केले, तर त्यांच्याकडून समष्टीचे केवळ कार्य होईल आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळे निर्माण होतील.
३. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या कृपेची अनुभूती आपण घेतली आहे. तळमळीने गुरुकार्य न केल्यामुळे वर्षानुवर्षे साधना करूनही आध्यात्मिक प्रगतीपासून समितीचे सेवक वंचित रहात आहेत.
४. समाजातील काही हिंदुत्वनिष्ठांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळालेले नसतांनाही त्यांनी कठीण परिस्थितीत कार्य करून स्वतःची आध्यात्मिक प्रगती केली आहे. आपल्याकडे साधनेसाठी अनुकूल परिस्थिती असून तशी आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी समिती सेवकांनी तळमळ वाढवली पाहिजे.