शिखांचे मौन !
मुसलमान आक्रमकांच्या विरोधात हिंदूंप्रमाणेच शीखही लढले. शिखांच्या काही गुरूंनी प्राणत्यागही केला. त्यांच्या मुलांना मोगलांनी अत्यंत क्रूरपणे ठार केले. तरीही ते मोगलांच्या विरोधात लढत राहिले. १८ व्या शतकात महाराजा रणजितसिंह यांनी मोगलांचा पराजय करून पंजाबमध्ये शिखांचे राज्य स्थापन केले. अशा शिखांना फाळणीच्या वेळी आताच्या पाकिस्तानातून भारतात यावे लागले; मात्र त्या काळात त्यांची मुसलमानांकडून कत्तल करण्यात आली. या दंगलीत १० लाख हिंदू आणि शीखही ठार झाले. त्यांच्या महिलांवर अत्याचार करण्यात आले. जे शीख पाकिस्तानात राहिले, त्यांचाही नंतर वंशसंहार करण्यात आला. तोच भाग अफगाणिस्तानमध्ये झाला आणि आता तो अंतिम टप्प्यात पोचला आहे, म्हणजे आता तेथे केवळ २० शीख कुटुंबे म्हणजे जवळपास १४० शीख शेष राहिले आहेत. काही दिवसांत तेही तेथून पलायन करून भारतात किंवा अन्य देशांत निघून जातील. ३ दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. गुरुद्वारावरील आक्रमण नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून केल्याचे इस्लामिक स्टेटने म्हटले आहे. या गुरुद्वाराला तालिबानने संरक्षण पुरवलेले आहे. हा मोठाच विनोद आहे; कारण तालिबानचे राज्य येण्यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांकडून शिखांना लक्ष्य करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आज त्याच तालिबान्यांना शिखांना संरक्षण पुरवावे लागत आहे. एका इस्लामी देशात शरीयतप्रमाणे कारभार चालू असतांना मुसलमान संघटना एकमेकांच्या विरोधात लढतात, हे लक्षात घ्यायला हवे. भारतातील शिखांची प्रमुख धार्मिक संघटना शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने या आक्रमणाचा निषेध केला. या पलीकडे काही विशेष करण्यात आलेले नाही, म्हणजे इस्लामी आतंकवादाचा विरोध करण्यासाठी शिखांकडून आंदोलन वगैरे किंवा शिखांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारवर दबाव निर्माण करणे आदी काही केल्याचे दिसून आले नाही. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबान्यांचे राज्य आले, तेव्हा शेकडो शिखांनी तेथून पलायन केले; पण अन्य शिखांनी काही केले नाही. विशेषतः कॅनडातील खलिस्तानवादी गप्प होते. आताही त्यांच्याकडून याविरोधात आवाज उठवण्यात आलेला नाही. याच कॅनडामध्ये कृषी कायद्याच्या विरोधात शिखांनी भारताच्या विरोधात आंदोलन केले होते. तेच शीख आज या विषयावर गप्प आहेत. दुसरीकडे पंजाबमध्ये खलिस्तानी कारवाया करणारे, त्यांना समर्थन देणारे, पंतप्रधान मोदी यांना कृषी कायद्यावरून विरोध करणारे शेतकरी याविषयी गप्प आहेत. यातून लक्षात येते की, ज्या शिखांचा इतिहास मुसलमान आक्रमकांच्या विरोधात लढण्याचा राहिला आहे, त्यांचे काही वंशज आज जिहाद्यांच्या अत्याचारांवर मौन बाळगत आहेत आणि जे शिखांचे मूळ आहे, त्या भारताला मात्र नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांच्या आणि जिहाद्यांच्या विरोधात भारतियांनी उभे राहिले पाहिजे. तसेच आज जे शीख जिहाद्यांच्या अत्याचारांवर मौन बाळगत आहेत, ते पुढे हिंदूंच्या विरोधात जिहाद्यांचे समर्थन करणार नाहीत ना ? याकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
शिखांनी खलिस्तान्यांचा विरोध करावा !
जिहादी आणि खलिस्तानी शीख यांच्याकडून हिंदूंवर आक्रमणे झाली, तर हिंदू स्वतःला वाचवू शकतात का ? याचा विचार करणे आवश्यक आहे. ८० च्या दशकांत पंजाबमध्ये खलिस्तान्यांकडून हिंदूंनाच लक्ष्य करण्यात आले होते, हे विसरता कामा नये. इतिहासामध्ये शिखांचा म्हणून कधी स्वतंत्र देश अस्तित्वात नव्हता. राजा रणजितसिंह यांचे राज्य हे शिखांचे राज्य म्हणून गणले जात नाही. त्यामुळे ‘ज्या शिखांना खलिस्तान हवे आहे आणि त्यासाठी त्यांना पाकिस्तान साहाय्य करत आहे’, असे वाटते, त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, ज्यांच्या दृष्टीने मुसलमानेतर काफिर आहेत, त्यात त्यांचाही समावेश आहे. असा पाकिस्तान जो त्यांच्याच धर्मियांवर अत्याचार करतो, शिखांवर अत्याचार करतो, तो खलिस्तान स्वतंत्र ठेवू शकेल का ? आणि अन्य इस्लामी राष्ट्रे त्याला कधी विरोध करतील का ? अशा वेळी ‘शिखांच्या साहाय्याला जगातील कोणती राष्ट्रे धावून येतील’, असे त्यांना वाटते ? ज्या युरोपीय राष्ट्रांनी युक्रेनला धोका दिला, ते शिखांच्या देशाला साहाय्य करतील का ? एकही राष्ट्र त्यांच्या साहाय्याला धावून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिखांना भारत हाच सुरक्षित प्रदेश आहे आणि तेच त्यांचे मूळ आहे, हे लक्षात ठेवून त्यांनी जिहाद्यांच्या विरोधात उभे रहाण्याची आवश्यकता आहे. खलिस्तानचे स्वप्न सोडून देण्यातच त्यांचे हित आहे. खलिस्तानवाद्यांना राष्ट्रप्रेमी शिखांनी समोर येऊन उघडपणे विरोध केला पाहिजे. अन्यथा ज्याप्रमाणे मुसलमान जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात पुढे येत नाहीत, म्हणजे त्यांचे त्यांना मूक समर्थन आहे, असे समजले जाते, तसाच भाग या शिखांच्या संदर्भात गृहीत धरला जाईल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
हिंदू आणि शीख यांना भारतात आणा !
काबूलच्या गुरुद्वारावर नूपुर शर्मा यांच्या विधानावरून आक्रमण झाले आहे, हे हिंदूंनी विसरू नये; कारण याचा एकाही इस्लामी देशाने निषेध केलेला नाही किंवा विधान केलेले नाही. एरव्हीही इस्लामिक स्टेटचा विरोध इस्लामी देश करतांना कधीच दिसून आले नाहीत. भारतातील मुसलमानही कधी त्यांचा विरोध करत नाहीत. त्यांनीही गुरुद्वारावरील आक्रमणाचा विरोध केलेला नाही, हे शिखांनी लक्षात घ्यायला हवे. भारत सरकारने तालिबान सरकारकडे याचा तीव्र निषेध केला, तरी तालिबानवर त्याचा काही परिणाम होण्याची शक्यता नाहीच. भारताने आता अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे जे काही हिंदू अन् शीख शेष राहिले आहेत, त्यांना भारतात आणून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचा विचार करणे आवश्यक आहे.
जिहादी आणि खलिस्तानी यांची अभद्र युती देशाला अन् शिखांनाही धोकादायक ! |