भगवंताला कळवळून प्रार्थना केल्यावर विशेष वैद्यकीय उपचारांविना तीव्र पाठदुखीचा त्रास उणावणे
१. घरी गेल्यावर पाठदुखीचा तीव्र त्रास चालू होणे
‘एप्रिल २०२१ मध्ये मी काही घरगुती कामासाठी देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे गेलो होतो. ते लहान गाव असल्याने तिथे विशेष वैद्यकीय सोयीसुविधा नाहीत. मी घरातील काही सेवा पूर्ण करत असतांना माझा जुना पाठदुखीचा त्रास पुन्हा तीव्रतेने चालू झाला. तो त्रास इतका झाला की, मला झोपल्यानंतर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळताही येत नव्हते.
२. १५ दिवसांनी त्रास थोडासा उणावणे आणि ‘सेवा बंद होईल कि काय ?’, असे वाटून देवाला शरण जाणे
गावात वैद्यकीय सुविधा अल्प आणि त्यात दळणवळण बंदी लागलेली होती; म्हणून वैद्यकीय उपचारही घेता आले नाहीत. साधारण १५ दिवस गेल्यावर थोडासा त्रास उणावला; परंतु मला बसता येत नव्हतेच. पूर्वी आधुनिक वैद्यांनी सांगितलेले व्यायाम मी करत होतो आणि वैद्यांना दूरभाष करून विचारून घेऊन काही औषधेही घेत होतो; परंतु ‘पुढे काय करायचे ?’, ते मला कळेना; कारण मला सेवेनिमित्त प्रवास, संगणकीय लिखाण करणे आणि आलेल्या संगणकीय धारिकांचे वाचन करणे यांसाठी बसणे अपरिहार्य असते. वेदनांचा ताण नव्हता; पण ‘सेवा बंद झाली, तर कसे करायचे ?’, या विचाराने मी देवाच्या चरणी शरण गेलो.
३. भगवंताला कळवळून प्रार्थना केल्यावर पाठदुखीचा त्रास उणावणे
एक दिवस झोपून व्यायाम करत असतांना भगवंताला कळवळून प्रार्थना झाली आणि पाठीत काहीतरी होत असल्याचे मला जाणवले. त्या वेळी मला फार त्रास होत होता. शरिराची हालचाल होत होती; परंतु भगवान श्रीकृष्णाचा निळसर हात माझ्या पाठीच्या आत फिरत असून त्याचा निळा रंग मला जाणवत होता. देव मला म्हणाला, ‘आता तुझा त्रास हळूहळू उणावत जाईल.’ हे ऐकून माझे मन निर्धास्त झाले. ज्या दिवशी हे झाले, त्या दिवशी दुपारी फार त्रास झाला आणि नंतर ४ दिवसांत त्रास हळूहळू उणावत गेला. त्रास इतका उणावला की, ‘जणूकाही मला पाठदुखी होती’, हेच मी विसरलो.
४. अल्प कालावधीत आणि कोणत्याही विशेष उपचारांविना पाठदुखीचा तीव्र त्रास केवळ देवाच्या कृपेनेच न्यून होणे
त्यानंतर पाठदुखीचा त्रास उणावत गेला. ‘पाठदुखी आरंभ झाल्यापासून जितका त्रास होत होता, त्याचा विचार केला, तर इतक्या अल्प कालावधीत आणि कोणत्याही विशेष उपचाराविना तो केवळ देवाच्या कृपेनेच न्यून होऊ शकतो’, हे माझ्या लक्षात आले. त्याबद्दल देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (१८.५.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |