अग्नीपथ योजना मागे घेणार नाही ! – सैन्यादलांची स्पष्टोक्ती !

भरतीपूर्व प्रत्येक तरुणाची पोलिसांकडून पडताळणी होणार !

नवी देहली – भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून तिन्ही सैन्यदलांत तरुणांची भरती करण्यासाठी आणलेल्या ‘अग्नीपथ’ योजनेला देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक विरोध केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर १९ जून या दिवशी तिन्ही सैन्यदलांकडून पत्रकार परिषद घेण्यात आले. यात ‘ही योजना मागे घेणार नाही’, हे स्पष्ट करण्यात आले. तसेच भरती करण्यात येणार्‍या तरुणांची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येणार आहे, जेणेकरून गुन्हेगारी कृत्य करणारे सैन्यामध्ये येऊ नयेत, असेही सांगण्यात आले.

१. या वेळी लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, कोचिंग इन्स्टिट्यूट चालवणार्‍यांनी विद्यार्थ्यांना अग्नीपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. ‘अग्नीवीर’ (अग्नीपथ योजनेतून सैन्यात भरती होणार्‍यांना ‘अग्नीवीर’ म्हटले जाणार आहे) होणार्‍याकडून त्याने कोणतेही निदर्शने किंवा तोडफोड केली नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे. या योजनेवर झालेल्या हिंसाचाराचा आम्हाला अंदाज नव्हता. सशस्त्र दलात शिस्तभंगाला स्थान नाही.

२. भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले की, २१ नोव्हेंबरपासून पहिली नौदल अग्नीवीर तुकडी ओडिशातील ‘आय.एन्.एस्. चिल्का’ या प्रशिक्षण संस्थेत पोचेल. यासाठी पुरुष आणि महिला अग्नीविरांना अनुमती असणार आहे. सध्या भारतीय नौदलात नौदलाच्या विविध जहाजांवर ३० महिला अधिकारी आहेत. अग्नीपथ योजनेच्या अंतर्गत महिलांचीही भरती करू, असे आम्ही ठरवले आहे. त्यांना युद्धनौकांवरही तैनात केले जाईल.

३. लेफ्टनंट जनरल पुरी म्हणाले की, पुढील ४-५ वर्षांत अग्नीवीर सैनिकांची संख्या ५० ते ६० सहस्र होईल आणि नंतर ती ९० सहस्र ते १ लाखांपर्यंत वाढेल. आम्ही योजनेचे विश्‍लेषण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी ४६ सहस्रांपासून प्रारंभ केला आहे.