गोवा क्रांतीदिनी ‘हातकातरो खांब संवर्धन समिती’ स्थापन करण्याचा निर्णय !
हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने जुने गोवे येथील ‘हातकातरो खांबा’च्या स्थळी श्रद्धांजली
पणजी – गोव्यातील स्थानिक राष्ट्रप्रेमी, देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी १८ जून, म्हणजेच गोवा क्रांतीदिनी जुने गोवे येथील ‘हातकातरो’ खांबाच्या (inquisition pillar) ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. पोर्तुगीज राजवटीतील ‘इन्क्विझिशन’ अत्याचारांच्या वेळी बलीदान दिलेल्या गोमंतकीय हिंदूंच्या अस्मितेचे ‘हातकातरो खांब’ हे एक प्रतीक आहे. आज तो दुरावस्थेत अणि दुर्लक्षित असल्याने त्याच्या संवर्धनासाठी ‘हातकातरो खांब संवर्धन समिती’ स्थापन करण्याचा निर्णय उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी घेतला आहे. यासाठी गोमंतकातील राष्ट्रप्रेमी, इतिहासप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
या वेळी ‘भारत माता की जय संघटने’चे प्रा. सुभाष वेलिंगकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, ‘भगवद्गीता फाऊंडेशन फॉर वेदिक स्टडीज’च्या श्रीमती एस्थर धनराज, नेपाळ येथील शंकर खरेल, ‘भारत सेवाश्रम संघा’चे फिजी येथील स्वामी संयुक्तानंद महाराज, डिचोली येथील ‘हिंदु राष्ट्र संघटने’चे श्री. सुबोध मोने, श्री. विजय होबळे, श्री. मंदार गावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी ‘आपल्या पूर्वजांनी धर्मरक्षणासाठी केलेल्या त्यागाची माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक गोमंतकियाने अ.का. प्रियोळकर लिखित ‘गोवा इन्क्विझिशन’ हे पुस्तक वाचावे’, असे आवाहन केले.
श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘जुने गोवे येथील ५०० वर्षे जुने चर्च ‘युनेस्को’ने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे; मात्र १२ व्या शतकातील ‘हात कातरो’ खांबाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे हिंदूंची धार्मिक ऐतिहासिक स्थळे नष्ट करण्याचा हा एक प्रयत्न आहे.’’
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांची पुनर्उभारणी करण्याचे घोषित केले आहे. त्यात ऐतिहासिक ‘हातकातरो खांबा’ला ही न्याय मिळायला हवा, अशी मागणी त्यांच्याकडे केली जाणार आहे. या वेळी इतरांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी अलोसियस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.