हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पुढाकार घेऊन कार्य करा !
हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या समारोपीय भाषणात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे आवाहन !
६ देशांसह भारतातील २६ राज्यांतील हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग !
रामनाथी, १८ जून (वार्ता.) – हिंदु राष्ट्राची स्थापना हे धर्मसंस्थापनेचे ईश्वरीय कार्य आहे. ईश्वर अवतार घेऊन कार्य करतो, तेव्हा भक्त या कार्यात स्वत:ची साधना म्हणून सहभागी होतात. जे कार्यात सहभागी होतील, त्यांची आध्यात्मिक उन्नती होईल, तसेच मृत्यूनंतरची पारलौकिक उन्नती सुलभतेने होईल. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेकडे तटस्थ राहून पाहू नका, तर पुढाकार घेऊन कार्य करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या समारोपीय मार्गदर्शनात केले. या अधिवेशनामध्ये भारतातील २६ राज्यांसह अमेरिका, नेपाळ, हाँगकाँग, फिजी, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथून ११७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
१२ जून या दिवशी चालू झालेल्या या अधिवेशनाचा १८ जून या दिवशी समारोप झाला. अधिवेशन संपल्यावर आपापल्या भागात गेल्यावर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित होऊन कार्य करण्याचा निर्धार उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांनी केला.
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले,
१. प्रांत, भाषा, संस्था, कार्यशैली आदी वेगळी असली, तरी आपल्या सर्वांचे ‘हिंदु राष्ट्र’ हेच लक्ष्य आहे. सध्याच्या अत्यल्प काळात १०० कोटी हिंदूंचे संघटन अशक्य आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समविचारी हिंदु शक्तींचे एकत्रीकरण करायचे आहे.
२. हिंदु राष्ट्राने प्रेरित सकल हिंदुशक्ती एकत्रित येईल, त्या क्षणी हे राष्ट्र हिंदु राष्ट्र होईल. त्यासाठी कुठल्या निवडणुकीची किंवा कुणाच्या बौद्धिक प्रश्नांची उत्तरे देण्याचीही आवश्यकता रहाणार नाही.
३. केवळ भारत राज्यघटनात्मक हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यास हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण होणार नाही. आपल्याला धर्माधारित हिंदु राष्ट्राचे बिजारोपण करावे लागणार आहे. धर्माधारित राज्यकारभार होत नाही, तोपर्यंत गाय, गंगा, सती, वेद, सत्यवादी, दानशूर आदींचे संपूर्ण संरक्षण होऊ शकत नाही.
४. कालप्रवाह हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल होत आहे, हे लक्षात घ्या. १० वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी सर्व जण ‘हिंदु राष्ट्र’ शब्दप्रयोगाकडे साशंक दृष्टीने पहात होते; परंतु आज संसदेत असो कि जनसंसदेत, ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द प्रचलित झाला आहे. हा काळाचा महिमा आहे.
५. भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर तटस्थ असला, तरी भविष्यात कुठल्या तरी एका बाजूने युद्धात सहभाग नोंदवावा लागणार आहे. वर्तमान स्थिती पहाता, हे युद्ध पुष्कळ दूर असल्याचे वाटत नाही.
६. ‘कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर झालेल्या दंगली, तसेच श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी झालेल्या मिरवणुकांवरील धर्मांधांची आक्रमणे, ही सर्व भविष्यातील गृहयुद्धाची रंगीत तालीम होती, हे लक्षात घ्या.
७. अराजकता निर्माण होते, तेव्हा देशाच्या आंतरिक आणि बाह्य सीमा असुरक्षित होतात. अशा वेळी सीमेपलीकडून आक्रमण आणि गृहयुद्ध यांचा धोका असतो. सीमेवरील सैनिक भारताचे रक्षण करतीलच; पण आंतरिक सुरक्षेसाठी सर्व देशभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना शारीरिक स्तरावर कार्य करावे लागेल.
हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रभावी मांडणी करणारे अभ्यासू वक्ते व्हा !आज सर्वत्र वैचारिक स्तरावर धु्रवीकरण होत असतांना आपण स्वतः हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रभावी मांडणी करणारे अभ्यासू वक्ते व्हा, तसेच लेखन, सामाजिक माध्यमे आदींच्या माध्यमातून वैचारिक कार्य करा, असे आवाहन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी या वेळी केले. |
हिंदुविरोधी ‘प्रार्थनास्थळ कायदा’ रहित करा ! – एकमताने ठराव संमत
हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणारा प्रार्थनास्थळ कायदा अर्थात् ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ हा कायदा रहित करून काशी, मथुरा, ताजमहाल, भोजशाळा आदी मोगल आक्रमकांनी बळकावलेली सहस्रावधी मंदिरे आणि भूमी हिंदूंच्या कह्यात द्यावीत, असा ठराव हिंदुत्वनिष्ठांनी एकमताने संमत केला.
संमत करण्यात आलेले अन्य ठराव
१. भारतातील बहुसंख्य हिंदूंना न्याय देण्यासाठी राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ शब्द वगळून तेथे ‘स्पिरिच्युअल’ शब्द घालावा आणि भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे.
२. भारतात ‘एफ.एस्.एस्.ए.आय.’आणि ‘एफ.डी.ए.’ यांसारख्या शासकीय संस्था असतांना धार्मिक आधारावर ‘समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण करणाऱ्या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर त्वरित बंद घालावी.
३. देशभरातील सरकारच्या नियंत्रणातील सर्व मंदिरांचे सरकारीकरण रहित करून मंदिरे भक्तांच्या हाती सोपवावीत.
४. केंद्रशासनाने संपूर्ण देशात ‘गोवंश हत्या बंदी’ आणि ‘धर्मांतरबंदी’ हे कायदे संमत करावेत. धर्मांतरबंदीसाठी राज्यघटनेतील कलम २५ मध्ये सुधारणा करून त्यातील ‘धर्माचा प्रचार’ हा शब्द काढण्यात यावा.
५. ‘नेपाळ हिंदु राष्ट्र घोषित व्हावे’, या नेपाळ येथील हिंदूंच्या मागणीचे हे अधिवेशन संपूर्ण समर्थन करते.
६. गोव्यात ‘इन्क्विझिशन’च्या नावाखाली २५० वर्षे गोमंतकियांवर केलेल्या अमानवीय आणि क्रूर अत्याचारांविषयी ख्रिश्चनांचे धर्मगुरु पोप यांनी गोव्यातील जनतेची सार्वजनिकरित्या क्षमा मागावी.
७. काश्मीर खोऱ्यात ‘पनून कश्मीर’ या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करून तेथे विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे.
८. पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंवरील अत्याचारांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि भारत सरकार यांच्याद्वारे अन्वेषण करून तेथील अल्पसंख्यांक हिंदूंना सुरक्षा द्यावी.
९. भारतात घुसखोरी केलेल्या रोहिंग्या तथा बांग्लादेशी मुसलमानांना परत पाठवण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा. सी.ए.ए. (नागरिकत्व सुधारणा) कायदा तात्काळ लागू करावा.
१०. मागील काही वर्षांत अहिंदूंच्या लोकसंख्येचा विस्फोट पहाता सर्वधर्मियांच्या लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी देशात त्वरित ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ लागू करण्यात यावा.
११. मानवतेच्या दृष्टीने आणि संवैधानिक अधिकारांचा विचार करून गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकातील ‘श्रीराम सेने’चे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा राज्य प्रवेशबंदी उठवावी.
अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी हात उंचावून ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा जयघोष करत उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी वरील ठरावांना मान्यता दिली.