भारतातील युवकांची भयावह दु:स्थिती !
आजच्या बहुसंख्य युवकांसमोर स्वत:चे करियर सोडले, तर विशिष्ट असे कोणतेच ध्येय किंवा आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वाऱ्यासमवेत सागरात कुठेही भरकटते, तसाच आजचा युवक आहे. चारित्र्यहीन आणि ध्येयशून्य अशी व्यक्तिमत्त्वे, तसेच भ्रष्ट राजकारणात आकंठ बुडून जनता अन् राष्ट्र यांना प्राधान्य न देता स्वार्थासाठी कष्ट घेणारी राजकारणी मंडळी ही आजच्या युवकांसमोर आदर्श असल्याने आजचा युवक भांबावून गेला आहे. तो हिंदी चित्रपटातील गलिच्छ आणि अश्लील गाणी मोठमोठ्याने गात अधिकाधिक व्यसनाधीन होत आहे. तो मादक व्यसनांच्याही आहारी गेला आहे. युवकांमधील विकृती वाढत आहेत. ‘हे वेळीच रोखले नाही, तर विकासापेक्षा विनाशच होणार आहे’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही.
रेव्ह पार्ट्यांमध्ये मश्गुल युवक आणि युवती !
पुणे येथील सिंहगड परिसरात पोलिसांनी काही मासांपूर्वी रात्री धाड घातली. या वेळी मोठ्या घरातील आणि विशेषत: अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या अनुमाने १०० युवक आणि युवती यांनी येथे ‘रेव्ह पार्टी’ आयोजित केली होती. त्यामध्ये मद्यधुंद झालेले युवक आणि युवती यांना पोलिसांनी कह्यात घेऊन नंतर सोडून दिले. अशा प्रकारे ‘रेव्ह पार्ट्या’ वरचेवर आयोजित केल्या जातात, असे आढळून आले आहे. मुंबईतील एका सामाजिक संस्थेने महाविद्यालयीन युवकांची आरोग्याच्या दृष्टीने पहाणी केली. हा अहवाल सांगतो की, शेकडा ९२ टक्के युवक व्यसनाधीन असून त्यात ८० टक्के प्रमाण मुलींचे आहे. त्याचा निष्कर्ष अतीभयानक आहे. काही मासांपूर्वीच अमली पदार्थांची पार्टी बोटीवर करण्यासाठी काही प्रथितयश लोकांची मुले प्रवासी जहाजावर गेली होती.
वाढदिवस विकृत पद्धतीने साजरा करणे !
वाढदिवस विकृत पद्धतीने साजरा करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून युवकांमध्ये रूढ झाली आहे. ज्याचा वाढदिवस आहे, त्याच्या तोंडावर आणलेला केक फासला जातो किंवा मारला जातो. त्यानंतर वाढदिवसासाठी आणलेला दुसरा केक कापला जातो. आता हे प्रकार दूरदर्शनसंचावरील विज्ञापनांमध्येही दिसू लागले आहेत. ज्याचा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा देण्याऐवजी त्याला उद्देशून अपशब्द उच्चारले जातात. काही ठिकाणी तर जाहीररित्या तलवारीने केक कापला जातो. तलवारीने केक कापल्याविषयी महाराष्ट्रात ठिकठिकाणी युवकांवर गुन्हे नोंद होत आहेत, तरीही युवकांना त्याचे काही वाटत नाही आणि नवीन ठिकाणी पुन्हा असे प्रकार केले जात आहेत.
पबजी खेळण्यास विरोध केल्याने आईची हत्या करणारा मुलगा !
पबजी या ऑनलाईन खेळाचे व्यसन बहुतांश तरुणाईला लागल्यामुळे आणि घंटोन्घंटे त्यावर वेळ वाया घालवल्यामुळे त्याविरुद्ध न्यायालयात पीडित पालकांनी याचिका केल्या, आवाज उठवला, तर त्यावर बंदी घालण्यात आली. तरीही युवकांना हे खेळ खेळण्यास उपलब्ध होत आहेत. उत्तरप्रदेशातील एका मुलाने त्याला पबजी खेळण्यास विरोध करणाऱ्या आईची हत्याच केली. आईचा मृतदेह घरात ३ दिवस पडून होता आणि मुलगा पबजी खेळ खेळण्यात मग्न होता. यातून किती प्रमाणात युवक स्वकेंद्रित झाला आहे, हे लक्षात येते.
प्रतिष्ठित शाळेतील मुलांची विद्यार्थिनींवर बलात्कार करण्यासाठी ‘व्हॉट्सॲप’वर चर्चा !
देहली येथील एका प्रतिष्ठित शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘व्हॉट्सॲप’चा गट सिद्ध केला होता. या गटावर शाळेतील संबंधित विद्यार्थ्यांच्या वर्गात शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींवर बलात्कार करण्याचा कट रचला जात होता. सहभागी विद्यार्थ्यांचे संभाषण अन्य विद्यार्थ्याकडून उघड झाल्यामुळे ही माहिती कळली. पोलिसांकडून संबंधित विद्यार्थ्यांना कह्यात घेण्यात आले.
युवकांना सामान्यज्ञान नसणे !
एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी युवक आणि युवती यांच्या सामान्यज्ञानाची माहिती व्हावी; म्हणून त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याचे चित्रीकरण केले. त्यामध्ये ‘महाभारत काय आहे ?’ ‘भीष्म कोण होते ?’ ‘द्रौपदी कोण होती ?’ ‘भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत ?’ असे सोपे प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरेही या युवक-युवती यांना देता आली नाही. त्यामुळे प्रश्न विचारणारे प्रतिनिधी आणि जनता या सर्वांनाच आश्चर्य वाटले.
माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात मद्यासाठी युवक अडून !
एका गावातील शाळेतील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचा कार्यक्रम करण्याचे ठरवले. यामध्ये मुले मद्याची मेजवानी करण्यावर अडून होते. परिणामी मुलींनी ‘त्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही’, असे सांगितले. मुलींनी गळ घातल्यावर युवकांनी पुष्कळ आढेवेढे घेत मेजवानी रहित केली. यातून सध्याच्या युवकांना मद्याची चटक किती प्रमाणात लागली आहे ? हे लक्षात येते. असे युवक राष्ट्राचे सोडाच, कुटुंबाचे तरी भले करू शकतात का ?
क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या करणे !
पालकांनी भ्रमणभाष संच काढून घेतला, भ्रमणभाषसंचाचा वापर अल्प करण्यास सांगितला म्हणून, तर कुणावर आई रागावली म्हणून आत्महत्या करण्याचे प्रकार घडत आहेत. कुणी परीक्षेचा ताण घेऊन, तर कुणी अल्प गुण मिळणार अथवा मिळालेले असले, तरी आत्महत्या करतात. कुणाचा प्रेमभंग झाल्यामुळे आत्महत्या करतात, तर कुणी प्रेमास नकार दिल्यामुळे युवक-युवतीची हत्या करतात. दुर्लभ असलेल्या मानवी जीवनाचे मूल्य कुणीच जाणून घेण्यास सिद्ध नाही, अशी स्थिती आहे.
युवकांचे अध:पतन करणारी ‘डे’ची विकृती !
भारत देशाची संस्कृती ही सर्वांत प्राचीन आणि समृद्ध आहे. विश्वातील अनेक संस्कृती या काळाच्या ओघात समाप्त झाल्या. सनातन हिंदु संस्कृती मात्र सर्व आघात सोसूनही टिकून आहे. असे असले, तरी आज पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आणि हिंदूंची धर्माप्रतीची अनास्था यांमुळे भारतात देव, देश अन् धर्म यांची पायमल्ली चालू आहे. याचाच परिणाम म्हणजे पाश्चात्त्यांची ‘डे संस्कृती’ भारतात वाढीस लागली. आज निरनिराळे ‘डे’ भारतात साजरे केले जातात. त्यांना कुठलाही शास्त्राधार नाही. पाश्चात्त्यांच्या या ‘डे’ संस्कृतीसमवेत विकृतीही आली आणि त्याला आपली युवा पिढी आज बळी पडत चालली आहे. यातून जर आपल्याला बाहेर पडायचे असेल, तर आपल्याला युवा पिढीमध्ये याविषयीचे प्रबोधन करावे लागेल आणि समाजात घडणाऱ्या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात सर्वांना संघटितपणे उभे रहावे लागेल.
संकलक : सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.