‘अग्नीपथ’च्या विरोधातील षड्यंत्र !

संपादकीय

‘अग्नीपथ’ या सैन्यभरतीच्या नव्या योजनेला १७ जून या दिवशी, म्हणजे शुक्रवारी उत्तरप्रदेशात विशेषतः बिहारमध्ये झालेला प्रचंड हिंसक विरोध पहाता हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील षड्यंत्राचा भाग आहे कि काय ? याची दाट शंका निर्माण होत आहे. गेल्या ३ वर्षांपासून आतंकवादी पुरस्कृत धर्मांध, साम्यवादी पुरस्कृत विद्यार्थी किंवा नक्षलवादी आणि त्यात आता भर पडलेले खलिस्तानवादी यांच्या अभद्र युतीने देशात ठिकठिकाणी आंदोलने, प्रसंगी दंगली, जाळपोळ आणि त्याही पुढे हिंदूंच्या हत्या करून सामान्य हिंदूंचे जीवन अस्वस्थ अन् त्रस्त करून सोडले आहे, तर सरकारच्या नाकीनऊ आणले आहे. जे.एन्.यू. प्रकरण, सीएए कायद्याला विरोध, शाहीनबाग प्रकरण, देहलीतील शेतकऱ्यांचे आंदोलन, तेथील दंगली, त्यानंतर पंतप्रधानांना पंजाबमध्ये झालेला विरोध या साऱ्या संपूर्ण देशविरोधी आणि समाजविघातक गोष्टींमागे विदेशी शक्तींचा किती मोठ्या प्रमाणात हात आहे ? हे वारंवार पुढे येत आहे. या आंदोलनांसाठी पैसा आणि येथील तरुणांची वैचारिक दिशाभूल करण्याचे काम याचे मूळ भारताबाहेरील देशात आहे, हे सिद्ध झाले. राष्ट्रविरोधी आंदोलने पुढच्या काळात वाढत जाण्याचीच शक्यता आहे. आज शत्रूराष्ट्र चीनपेक्षा आपला सैन्यावरील खर्च कितीतरी न्यून आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने आणलेली ‘अग्नीपथ’ योजना ही आगामी काळातील धर्मांधांची अंतर्गत बंडाळी मोडून काढण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अग्नीविरांना ४ वर्षांत वेतन आणि निवृत्तीवेतन मिळण्यासह ते स्वतःचा व्यवसायही चालू करू शकतात. तसेच त्यांना पुष्कळ चांगल्या सवलती देण्यात येणार आहेत.

देशातील तरुण पिढीचे प्रचंड मनुष्यबळ गल्लीत चकाट्या पिटण्यात वाया जाते, ते या महत्त्वाच्या वयात देशाच्या कामी येऊ शकणार आहे. देशाला ‘गजवा-ए-हिंद’ बनवणाऱ्या आतंकवाद्यांच्या षड्यंत्राला ही अग्नीपथातील तरुणांची भरती हा अडथळा आहे आणि त्यामुळे कुठलीही चर्चा वगैरे न करता थेट रेल्वे गाड्या जाळण्याचे आदेश देशद्रोही शक्तींकडून आंदोलनकर्त्यांना आले आहेत. यात राष्ट्रीय जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आदी पक्षांनी उत्तरप्रदेशातील सरकारविरोधी बंद म्हणजे प्रत्यक्षात झालेल्या रेल्वे जाळण्याच्या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दिला. खरेतर सरकारच्या देशहिताच्या व्यापक योजनेला असा हिंसक विरोध करणारे हेच देशाचे पहिले शत्रू आहेत, असे म्हटले तर चूक ठरू नये. रशिया, चीन, इस्रायल येथे तरुण वयात सैन्यभरती अनिवार्य आहे. तसे येथे केले, तर काय होईल ? राष्ट्रीय लोकदलाच्या वतीने संपूर्ण जुलै मासात उत्तरप्रदेशातील मुसलमानबहुल शहरांत अग्नीपथच्या विरोधात आंदोलनासाठी बैठका घेण्यात येणार आहेत. त्या होण्यापूर्वी सरकारने या देशद्रोही शक्तींचा बंदोबस्त केला पाहिजे !